Join us

महत्त्वाचे - चितळे समिती -

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

चितळे अहवालाच्या

चितळे अहवालाच्या
अंमलबजावणीसाठी समिती
मुंबई: राज्याच्या सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने आज वरिष्ठ अधिकार्‍यांची एक समिती नेमली.
चितळे समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे १ मार्च २०१४ रोजी सादर केला होता. या अहवालावरील कार्यपालन अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात १४ जून रोजी मांडण्यात आला. त्यावेळी चितळे समितीने सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीस कटिबद्ध असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते.
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात वित्त, महसूल, कृषी व पणन, जलसंपदा, जलसंधारण, रोहयो, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन आदी विभागांच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. चितळे समितीने सुचविलेल्यांपैकी ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीचे काम ही समिती करेल. (विशेष प्रतिनिधी)
-------------------------------------------------
यासाठी नेमली होती चितळे समिती
राज्याचे सिंचन गेल्या दहा वर्षांत केवळ ०.१ टक्के इतकेच वाढले, असे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात कृषी विभागाचा हवाला देवून म्हटले होते आणि त्यावरून राजकीय वादळ उठले. शेवटी शासनाने चितळे समिती नेमली होती. या समितीने आर्थिक पाहणी अहवालासाठी आकडेवारी संकलित करण्याची पद्धत सुधारण्याची शिफारस केली होती. --------------------------------------------------