Join us

सिलिंडर असल्यास यापुढे केरोसिन नाही

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

सिलिंडर असल्यास

सिलिंडर असल्यास
यापुढे केरोसिन नाही
-शहर आणि ग्रामीण भागात
केरोसिनचे समान वाटप
मुंबई - घरगुती वापराचे गॅस सिलिंडर असलेल्यांना यापुढे शिधापत्रिकेवर केरोसिन न देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांना केरोसिनचे समान वाटप करण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे.
एका गॅस सिलिंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना केरोसिन मिळणार नाही, असे विभागाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा कोटा होता. शहरांसाठीच्या कोट्याची विभागणी आठ प्रकारात करण्यात आली होती. शहरी भागात इंधनाचे इतर स्रोत जसे लाकूड, गोवर्‍या व इतर उपलब्ध नसल्याचे कारण देत इतकी वर्षे शहरी नागरिकांसाठी जादा केरोसिन वाटप केले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान केरोसिन वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्याला सध्या केंद्र सरकारकडून एकूण मागणीच्या केवळ २८ टक्केच केरोसिन मिळते. राज्याची मागणी मासिक एक लाख ७७ हजार किलो लिटरची असून प्रत्यक्षात ४६ हजार किलोलिटरच केरोसिन मिळते. (विशेष प्रतिनिधी)
-----------------------------------
असे मिळणार केरोसिन
एक व्यक्ती २ लिटर
दोन व्यक्ती ३ लिटर
तीन व्यक्ती वा त्याहून अधिक ४ लिटर
----------------------------------