शेतकर्यांना तातडीने मदत न दिल्यास अधिवेशन बंद पाडू
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
आजी-माजी विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला इशारा, पीक विमा योजना बदला
शेतकर्यांना तातडीने मदत न दिल्यास अधिवेशन बंद पाडू
आजी-माजी विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला इशारा, पीक विमा योजना बदलानाशिक : अवकाळी पावसामुळे नाशिकसह राज्यभरात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्त्येचे पाप घेण्यापेक्षा राज्य सरकारने आठ दिवसांत तत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनाला बंदी घालू, असा इशारा विरोधी पक्षनेते आमदार एकनाथ शिंदे व माजी विरोधी पक्षनेते आमदार रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.विरोधी पक्षनेत्यांनी शुक्रवारी (दि. २१) माडसांगवी, ओझर व खडकजांब या गावांना भेटी देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय पीक विमा योजना ही शेतकर्यांच्या हिताची नव्हे, तर विमा कंपनीच्या सोयीची आहे. अडीच लाखांच्या पीक विम्याला नऊ हजार रुपये शेतकर्यांकडून घेतले जातात. पीक विमा योजनेतून शेतकर्यांची लूट होत असून, शेतकर्यांना कवडीचा लाभ झालेला नाही. मराठवाड्यात पीक विमा योजनेत ३२ कोटी जमा झाले; मात्र शेतकर्यांना एक रुपयाचे नुकसान होऊ दिलेले नाही. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हाती असलेली नगदी पिके गेली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आठ दिवसांच्या आत राज्य सरकारने मदत जाहीर न केल्यास शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनास उपस्थित राहू देणार नाही. नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्त्या करत असून, बागलाण व देवघट येथील दोन शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. आत्महत्त्येचे पाप सरकारने माथी घेऊ नये. आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या तर त्याला थेट मुख्यमंत्री व सचिवांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस आपणच केली होती? मग आता तुमच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करणार काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार, बागायतीसाठी ५० हजार, तर फळबागांसाठी एकरी एक लाख मदत जाहीर करावी. आठ दिवसांत शेतकर्यांना मदत जाहीर झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीत बसू देणार नाही, असेही आमदार शिंदे व आमदार कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)