Join us

जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोनची हातमिळवणी

By admin | Updated: March 20, 2017 11:52 IST

आयडिया आणि व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर स्थापन होणा-या कंपनीत एकूण 40 कोटी ग्राहक असणार आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - आयडिया आणि व्होडाफोनने हातमिळवणी केली असून विलनीकरण झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली आहे. आयडिया सेल्यूलर आणि ब्रिटिश टेलिकॉम कंपनीच्या भारतीय युनिट व्होडाफोनने हातमिळवणी केल्याने देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी झाली आहे. आयडिया आणि व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर स्थापन होणा-या कंपनीत एकूण 40 कोटी ग्राहक असणार आहेत. याचाच अर्थ देशातील प्रत्येक तिस-या ग्राहकामागील एक ग्राहक या कंपनीचा असेल. 
 
आयडिया आणि व्होडाफोनचं विलिनीकरण देशभरातील नेटवर्कचं सर्वात मोठं जाळं उभारणार असल्याचं कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. रिलायन्स जिओने टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश केल्यापासून इतर मोबाईल कंपन्यां धास्तावल्या असून अनेकांनी मोबाईल दर कमी करत विलिनीकरणाचा पर्याय स्विकारला आहे. काही दिवसांपूर्वी व्होडाफोनने आपल्या 4G इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
 
विश्लेषकांनुार व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्याने रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला चांगली स्पर्धा मिळेल. 'आम्ही उच्च दर्जाच्या डिजीटल पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरुन भारतीय डिजीटल लाईफस्टाईलकडे वळतील तसंच भारतीय सरकारच्या डिजीटल इंडियाचं स्वप्न सत्यात उतरेल', असं आदित्य बिर्ला ग्रपुचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला बोलले आहेत. पुढील वर्षापर्यंत हे विलिनीकरण होणार आहे. 
 
नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत वोडाफोनची 45.1 टक्के भागीदारी असेल तर आयडीयाची 26 टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित 35 टक्के बाजारातले इतर भागीदार असतील.