मुंबई : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक ‘आयसीआयसीआय’ने दोन विमा कंपन्यांच्या नोंदणीची तयारी चालविली आहे. योग्य वेळी कंपन्यांच्या नोंदणीचा विचार केला जाईल, असे आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर यांनी सांगितलेवृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कोचर म्हणाल्या की, मूल्यांकन खरोखरच उत्तम आहे, असे जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही हे पाऊल उचलू. आम्ही जीवन विमा आणि साधारण विमा अशा दोन्ही प्रकारच्या विमा कंपन्यांवर विचार करू शकतो. तथापि, लगेचच कोणतीही आनुषंगिक कंपनीच्या नोंदणीची योजना बँकेसमोर नाही. तत्पूर्वी, योग्य आकार आणि योग्य मूल्यात मिळाल्यास नव्या बँकांचे अधिग्रहण करण्यास आयसीआयसीआय बँक तयार आहे, असे चंदा कोचर यांनी सांगितले होते. गेल्या आर्थिक वर्षात आयसीआयसीआय बँकेने आपल्या नेटवर्कमध्ये सामान्य व्यवहारांतर्गत ६५० शाखा नव्याने जोडल्या. यात जवळपास सर्वसामान्य बँकेच्या बरोबरीने लाभ झाला आहे. अशा स्थितीत बँकेला सार्थक सौदा करणे आवश्यक आहे. आयसीआयसीआयने यापूर्वी ३००-४०० शाखा असलेल्या बँकांचे अधिग्रहण केले होते. त्यावेळी त्या बँका आमच्या कारभाराच्या दृष्टीने योग्य आकाराच्या होत्या; मात्र आता आमची क्षमता वाढली आहे, असे कोचर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. आयसीआयसीआय बँकेने यापूर्वी बँक आॅफ मदुराई, सांगली बँक आणि बँक आॅफ राजस्थान यांचे अधिग्रहण केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन विमा कंपन्यांच्या नोंदणीची आयसीआयसीआयची तयारी
By admin | Updated: July 14, 2014 01:20 IST