Join us  

ICICI Bank Credit Card: 'या' बँकेनं ब्लॉक केली हजारो क्रेडिट कार्ड, १७ हजार युझर्सचा डेटा लीक; जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:20 PM

ICICI Bank Credit Card : त्रुटीमुळे, निवडक जुन्या ग्राहकांना बँकेच्या मोबाइल ॲपवर नवीन कार्डधारकांची संपूर्ण माहिती दिसू लागली असल्याचं समोर आलंय.

ICICI Bank Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ICICI बँकेने सुमारे १७ हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच जारी केलेल्या क्रेडिट कार्डचे तपशील चुकीच्या ग्राहकांशी जोडले गेल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर सर्व कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत. 'या प्रकरणात कोणत्याही कार्डचा गैरवापर झाल्याची कोणतीही माहिती नाही. परंतु ग्राहकाला होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यास तयार असल्याचं बँकेनं म्हटलंय. 

एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या नवीन ग्राहकांचे क्रेडिट कार्ड क्रमांक काही जुन्या ग्राहकांच्या कार्डाशी चुकून लिंक झाले आहेत. या त्रुटीमुळे, निवडक जुन्या ग्राहकांना बँकेच्या मोबाइल ॲपवर नवीन कार्डधारकांची संपूर्ण माहिती दिसू लागली असल्याचं समोर आलंय. 

बँकेनं काय म्हटलंय? 

बुधवारी सोशल मीडियावर बँकेच्या या चुकीबाबतची चर्चा सुरू होती. परंतु आता ती चूक दुरुस्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. चुकीच्या मॅपिंगमुळे जुन्या युझर्सना नव्या क्रेडिट कार्ड ग्राहकांची माहिती दिसत होती. "या समस्येचा सामना करावा लागणाऱ्यांमध्ये एकूण क्रेडिट कार्ड पोर्टफोलियोपैकी ०.१ टक्के लोकांचा समावेश आहे. या सर्व कार्ड्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. या ग्राहकांना नवी कार्ड जारी करण्यात येतील," असं आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यानं सांगितलं. 

"या कार्डांचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु आर्थिक नुकसान झाल्यास बँक ग्राहकांना योग्य ती नुकसान भरपाई देईल," असंही बँकेकडून सांगण्यात आलंय. 

असं समोर आलं प्रकरण? 

मात्र, चुकीचं मॅपिंग करूनही क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. याचे कारण म्हणजे कोणतीही भारतीय ऑनलाइन वेबसाइट नवीन ग्राहकाच्या मोबाइल फोनवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयसीआयसीआय बँकेचा क्रेडिट कार्डचं हे प्रकरण समोर आलंय. रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेला आयटी नियमांचं सातत्यानं उल्लंघन केल्याबद्दल क्रेडिट कार्ड देण्यास आणि नवीन ग्राहक ऑनलाइन पद्धतीनं जोडण्यास तात्काळ बंदी घातली आहे. 

टॅग्स :आयसीआयसीआय बँक