Join us  

मला काढून टाकणार, टाटा सन्सच्या बोर्डाच्या बैठकीआधीच सायरस मिस्त्रींनी पत्नीला केला होता मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 11:36 AM

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक होण्याआधीच सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

मुंबई - टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक होण्याआधीच सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. 24 ऑक्टोंबर 2016 रोजी संचालक मंडळाची बैठक सुरु होण्याआधी त्यांनी पत्नी रोहिकाला मेसेज करुन आपल्याला नोकरीवरुन काढून टाकणार असल्याचे कळवले होते. दोन वाजता सायरस मिस्त्री या बैठकीला हजर राहणार होते. 

मिस्त्री यांच्या हाताखाली काम करणारे ग्रुपचे एक्झिक्युटिव काऊंसिलचे माजी सदस्य निर्मलय कुमार यांनी शनिवारी ब्लॉगमधून ही माहिती दिली. निर्मलय यादव यांना सुद्धा त्याच दिवशी पदावरुन हटवण्यात आले. मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय टाटा समूहाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आला असता असे कुमार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

मिस्त्री यांचा जाहीर अपमान केल्यानंतर जे काही घडले ते टाळता आले असते. मिस्त्री यांचा करार 31 मार्च 2017 रोजी संपत होता. त्यांना असे अचानक काढण्याऐवजी संचालक मंडळाने पाच महिने वाट पाहायला हवी होती असे निर्मलय कुमार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. कुमार सध्या सिंगापूर मॅनेजमेंट युनिवर्सिटीमध्ये मार्केटिंग विषयाचे प्राध्यापक आहेत. 

टाटा समूहाने आजतागयत मिस्त्री यांना पदावरुन हटविण्याच्या निर्णयाबद्दल योग्य कारण सांगितलेले नाही. टाटा ग्रुपच्या 148 वर्षांच्या इतिहासात फक्त सहा चेअरमन राहिल्याचा इतिहास आहे त्यामुळे मिस्त्री यांना अचानक हटवण्याचा निर्णय पटणारा नव्हता. टाटा समूहाने मिस्त्री यांची निवड फार विचारपूर्वक केली होती. चेअरमन निवडण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु होती असे निर्मलय कुमार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :टाटा