पणजी : गोव्यातून जमा होणाऱ्या प्राप्तिकरात तीन वर्षांत प्रचंड घसरण झाली आहे. २०१३-१४च्या अखेरीस एकूण रक्कम २० टक्क्यांवर आली आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षात ३ हजार ४४१.३० कोटी रुपये प्राप्तिकर जमा झाला होता. मात्र, २०१३-१४ मध्ये ही रक्कम फक्त ९१८ कोटी रुपये आहे. खाणमालकांतर्फे भरल्या जाणाऱ्या प्राप्तिकरात खाणबंदीनंतर मोठा फरक झाला आहे. खाणबंदीपूर्वी पाच खाणमालकांकडून १ हजार ७४२ कोटी रुपये प्राप्तिकराच्या रूपात भरले जायचे. आता, म्हणजे २०१३-१४ मध्ये हा आकडा फक्त ४९.०१ कोटी रुपयांवर आला आहे. खनिज उलाढालीतून मिळणाऱ्या सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांवर प्राप्तिकर खात्याला पाणी सोडावे लागले. ही माहिती, माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाली.२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी आगाऊरक्कम भरणाऱ्या पहिल्या पाच उद्योजकांमध्ये कॉलोरकॉन एशिया कंपनी ४६ कोटी, तुमकूर मिनरल्स कंपनी २९.६८ कोटी, ग्वाला कोझर इंडिया कंपनी २९.४१ कोटी, नानू इस्टेट कंपनी ९.२५ कोटी व साउथ वेस्ट पोर्ट कंपनीने ८.५५ कोटी रुपये भरले आहेत. सर्वाधिक कर भरणाऱ्यांची जागा आता अन्य व्यावसायिकांनी घेतली आहे.२०१०-११ आणि २०११-१२ या दोन आर्थिक वर्षांत प्राप्तिकर भरणाऱ्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये सेसा गोवा व सेसा रिसोर्सिस या कंपन्यांनी सतत पहिला क्रमांक पटकावला होता. या कंपन्यांनी दोन्ही वर्षी प्रत्येकी ८०० कोटींच्या वर कर भरला आहे. २०१०-११ मध्ये सेसा कंपनीने ८८५ कोटी रुपये तर २०११-१२ या आर्थिक वर्षात ६४० कोटी (सेसा) आणि सेसा रिसोर्सिसतर्फे २३४ कोटी रुपये भरल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात पहिल्या पाचमध्येही या कंपनीचा समावेश नाही.व्ही. एस. धेंपो कंपनीने २०१०-११ मध्ये ३३५ कोटी रुपये प्राप्तिकराच्या स्वरूपात भरले. मात्र, २०१२-१३ या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच खाणमालकांच्या यादीत धेंपो कंपनीचे नाव नाही. २०१३-१४ मध्ये या कंपनीने ३.४० कोटी रुपये कर भरला आहे.मे. व्ही. एम. साळगावकर कंपनीने आतापर्यंत प्रत्येक वर्षी प्राप्तिकर भरल्याची नोंद आहे. मात्र, खाणबंदीमुळे ही रक्कम प्रत्येक वर्षी कमी होत गेली. २०१०-११ मध्ये ३३५ कोटी रुपये प्राप्तिकर भरणारी ही कंपनी २०१३-१४ मध्ये चक्क ९.८३ कोटींवर आली. त्यापूर्वीच्या वर्षी ही रक्कम व्ही. एम. साळगावकर व बंधू ३२.३० कोटी व साळगावकर सेल्स इंटरनॅशनलतर्फे २५.९६ कोटी रुपये प्राप्तिकर भरला होता.सोसिएदाद द फोमेंतो या कंपनीने २०१२-१३ पर्यंत प्राप्तिकर भरल्याची नोंद आहे. पहिल्या पाच खाण कंपन्यांमध्ये ‘फोमेंतो’चे नाव आहे. ही रक्कम १७५ कोटी (२०१०-११)पासून दोन वर्षांत फक्त ६५ कोटी (२०१२-१३)वर आल्याचे दिसते. (प्रतिनिधी)आदल्याच वर्षी कंपनीने १९५ कोटी रुपये प्राप्तिकर भरला होता. २०११-१२ या आर्थिक वर्षात चौगुले कंपनीने १९५ कोटी रुपये प्राप्तिकर भरला. मात्र, त्यापूर्वीच्या वर्षी अथवा नंतरच्या काळात या कंपनीने पहिल्या पाचांतील स्थान गमावले. बांदेकर कंपनीने १५.७५ कोटी रुपये प्राप्तिकर भरून २०१२-१३ या वर्षी पहिल्या पाच प्राप्तिकर भरणाऱ्या खाणमालकांमध्ये स्थान प्राप्त केले होते.
गोव्यातील प्राप्तिकरात प्रचंड घसरण
By admin | Updated: July 15, 2014 02:19 IST