Join us  

हुआवीने मानले भारताचे आभार; ५ जी चाचण्यांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 3:48 AM

कंपनी म्हणते, सरकारसह उद्योगांवरही आम्हाला पूर्ण विश्वास

बीजिंग : आगामी ५ जी चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल ‘हुआवी’ने भारताचे आभार मानले आहेत. अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे चिनी कंपनी हुआवीची मोठी कोंडी झाली होती. भारताने ५ जी चाचण्यांत सहभागी होण्याची परवानगी दिल्यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.भारत हा दूरसंचार तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे हुआवीला ५ जी चाचण्यांत सहभागी होण्यासाठी मिळालेल्या परवानगीला महत्त्व आहे, असे सूत्रांनी सांगितले. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी यासंबंधीची घोषणा करताना म्हटले होते की, अतिजलद ५ जी नेटवर्कच्या चाचण्या घेण्यासाठी सरकार सर्व दूरसंचार सेवादात्यांना हवाई लहरी (एअरवेव्हज्) उपलब्ध करून देईल.चीनमधील बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी असलेल्या हुआवीने एरिक्सनसारख्या पाश्चात्य कंपन्यांसमोर कडवी स्पर्धा उभी केलेली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करून अमेरिकेने हुआवीवर बंदी घातली आहे. असे असले तरी जगातील अनेक देशांनी हुआवीचे तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी दूरसंचार सेवादात्यांना दिली आहे. भारतानेही तशी परवानगी देण्याचे संकेत ५ जी चाचण्यांच्या निमित्ताने दिले आहेत. (वृत्तसंस्था)भारताच्या दूरसंचार क्षेत्राला नवसंजीवनीकंपनीच्या आंतरराष्ट्रीय मीडिया अफेअर्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सिरिल शू यांनी बीजिंगमध्ये एक निवेदन जारी करून सांगितले की, ५ जी चाचण्यांच्या परवानगीसाठी भारत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत हुआवीला स्थान देण्यात आले आहे. हुआवीवर विश्वास कायम ठेवल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानतो.शू यांनी म्हटले की, केवळ नवीनतम तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्तेचे नेटवर्क याद्वारेच भारताच्या दूरसंचार क्षेत्राला नवसंजीवनी मिळू शकते, असे आम्हाला वाटते. भारतात ५ जी तंत्रज्ञानाबाबत आमचा मोदी सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत सरकारसह उद्योगांवरही आम्हाला पूर्ण विश्वास आहे. हुआवीने भारतासोबतची बांधिलकी नेहमीच जपली आहे.

टॅग्स :हुआवे