Join us  

आतापर्यंत 2000 च्या किती नोटा परत आल्या? RBI दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:39 PM

दोन हजारांच्या नोटा आता परत करता येतील का? काय सांगतो नियम, पाहा

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने 2 हजारांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत RBI कडे किती नोटा परत आल्या, याबाबत माहिती समोर आली आहे. आरबीआयने एका निवेदनात सांगितले की, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 97.26 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत. 19 मे पर्यंत 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. अद्याप 9,760 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा परत आलेल्या नाहीत. 

RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. बँकेने यामागे क्लीन नोट पॉलिसीचा हवाला दिला होता. मात्र, 2000 रुपयांची नोट अवैध ठरवली नव्हती. यानंतर 2000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला 30 सप्टेंबर अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. नंतर ती 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. तोपर्यंत नोटा कोणत्याही बँक किंवा RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात.

आता नोटा कशा बदलल्या जात आहेत?आता तुम्ही RBI च्या 19 इश्यू ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा पाठवू शकता. ही कार्यालये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आहेत. याशिवाय तुम्ही या नोटा भारतीय पोस्टद्वारे आरबीआय कार्यालयात पाठवू शकता. या प्रक्रियेसाठी सोबत वैध ओळखपत्र, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असावे. नोट जमा केल्यानंतर ते मूल्य तुमच्या खात्यात दिसू लागेल.

2000 च्या नोटा का बंद केल्या?2000 रुपयांची नोट क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत डिक्रिक्युलेट करण्यात आली होती. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर बाजारात रोखीची कमतरता भरून काढण्यासाठी त्या आणल्या गेल्या. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. पण 500 रुपयांच्या आणि इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बाजारात आल्यावर 2000 रुपयांच्या नोटेचे कामही संपले. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 2000 रुपयांच्या नोटा अजूनही वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनिश्चलनीकरणबँकिंग क्षेत्रकेंद्र सरकार