ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर ओढावलेले चलन संकट चार महिन्यानंतर अखेर संपले आहे. आजपासून बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात आली आहे. बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावर टाकलेली 50 हजारांची मर्यादा संपणार असून, बँकेतून तुम्हाला कितीही पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार पूर्ववत होणार आहेत.होळीच्या सणाला सर्वसामान्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. बचत खात्याबरोबरच एटीएममधूनही आता कितीही पैसे काढता येणार आहेत. चलन तुटवडा संपुष्टात आल्यानं आता सर्व व्यवहार सुरळीत आणि सामान्य होतील. 13 मार्च म्हणजेच आजपासून बचत खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णपणे संपुष्टात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे.रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच चलनटंचाईची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने एटीएममधून प्रति दिवस दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा दिल्याने नागरिकांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी काहीसा दिलासा मिळतो आहे. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरबीआयनं पैसे काढण्यावर मर्यादा घातली होती.
होळीचे गिफ्ट - एटीएम, बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात
By admin | Updated: March 13, 2017 10:29 IST