Join us  

ऐतिहासिक! डिझेल भडकले, किमतीत पेट्रोललाही मागे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:14 AM

लॉकडाऊनच्या काळात सुमारे ८२ दिवस या किमती कायम होत्या. त्यानंतर ७ जूनपासून पुन्हा दररोज किमतींचा आढावा घेणे सुरू झाले आहे.

नवी दिल्ली : इंधनाच्या दरातील वाढीचे सत्र सुरूच असून, बुधवारी प्रथमच पेट्रोलच्या किमतीपेक्षा डिझेलची किंमत जास्त झाल्याचे बघावयास मिळाले. सलग १८व्या दिवशी डिझेलच्या किमतीमध्ये लिटरमागे ४८ पैशांनी वाढ करण्यात आली. पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांचा आढावा घेऊन देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज जाहीर केल्या जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सुमारे ८२ दिवस या किमती कायम होत्या. त्यानंतर ७ जूनपासून पुन्हा दररोज किमतींचा आढावा घेणे सुरू झाले आहे.सलग १८व्या दिवशी डिझेलच्या किमतीत ४८ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये डिझेल ७९.८८ रुपये प्रतिलिटर अशा दराने मिळत आहे. पेट्रोलच्या दरामध्ये बुधवारी कोणताही बदल करण्यात न आल्याने पेट्रोलचे दर लिटरला ७९.७६ रुपये असे राहिले आहे. आतापर्यंतच्या कालावधीत एका पंधरवाड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये झालेली सर्वाधित वाढ ४ ते ५ रूपये प्रति लिटर अशी राहिली आहे.

>डिझेलवरील करामध्ये होत गेली वाढपूर्वी पेट्रोलपेक्षा डिझेलवर कर कमी प्रमाणात लावण्यात येत असल्याने डिझेलच्या किमती या लिटरला १८ ते २० रुपये एवढ्या कमी होत्या. कालांतराने करांचे प्रमाण वाढत गेले. तसेच पेट्रोल व डिझेलवरील करांमधील फरक कमी होत गेला. डिझेलच्या एकूण विक्री किमतीपैकी ६३ टक्के वाटा हा विविध करांचा आहे. सध्या डिझेलवर ४९.४३ रुपये एवढा कर आकारला जातो. यापैकी ३१.८३ रुपये हे केंद्रीय अबकारी कराचे असून, १७.६० रुपये व्हॅटचे आहेत. पेट्रोलवरील करांचा भार ६४ टक्के आहे. सध्या प्रतिलिटर ५०.६९ रुपये कर असून, ३२.९८ रुपये केंद्रीय अबकारी कर तर १७.७१ रुपये व्हॅट आकारला जातो.आतापर्यंत डिझेलचा सर्वाधिक दर १६ आॅक्टोबर २०१८ रोजी नोंदविला गेला होता. त्या दिवशी राजधानी दिल्लीत डिझेलची विक्री ७५.६९ रुपये प्रतिलिटर या दराने झाली. ४ आॅक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी दिल्लीमध्ये हा दर ८४ रुपये प्रतिलिटर असा सर्वाधिक होता.

टॅग्स :पेट्रोलडिझेल