मुंबई : जेट एअरवेजची खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या हिंदुजा उद्योग समूहास जेटमधील प्रमुख भागीदार नरेश गोयल आणि एतिहाद एअरवेज यांचा पाठिंबा मिळाला आहे. हिंदुजा समूह याच आठवड्यात जेटसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याचे समजते.
नरेश गोयल हे जेटचे संस्थापक असून, एतिहादप्रमुख हिस्सेदार आहेत. या दोघांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे हिंदुजा समूहाचा मार्ग मोकळा झाला आहे. एसबीआय कॅपिटल मार्केटच्या नेतृत्वाखालील गुंतवणूक बँक समूहाशीही हिंदुजांचे बोलणे सुरू आहे.सूत्रांनी सांगितले की, नरेश गोयल आणि हिंदुजा यांचे सुमारे दोन दशकांपासून चांगले संबंध आहेत. जेटवर थकलेल्या १२ हजार कोटींच्या कर्जात बँकांनी मोठी सवलत द्यावी, अशी हिंदुजा समूहाची अपेक्षा आहे.
बहुलांश भागीदारी खरेदी करून जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्याचा हिंदुजा समूहाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, दिवसेंदिवस जेट एअरवेजचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. कंपनीचे काम पूर्णत: थांबले आहेच. शिवाय पायलटही स्पर्धक कंपन्यांच्या सेवेत रुजू होत आहेत. अधिग्रहणास जितका उशीर होईल, तितके संकट वाढत जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.