Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सर्वाधिक कर्जबुडवे

By admin | Updated: December 25, 2014 00:25 IST

‘बॅँकांकडून घेतलेले कर्ज जाणून-बुजून बुडविण्याची वृत्ती बळावत असल्याने कर्जबुडव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

सतीश डोंगरे, नाशिक‘बॅँकांकडून घेतलेले कर्ज जाणून-बुजून बुडविण्याची वृत्ती बळावत असल्याने कर्जबुडव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये एक कोटींपेक्षा अधिक कर्ज बुडविणाऱ्यांची संख्या १०८० एवढी आहे. एकट्या मुंबईमध्ये केवळ दोन बड्या उद्योग समूहांनी २२ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज बुडविले आहेत. कर्ज घ्यायचे; पण ते घेतलेल्या कारणांसाठी वापरायचेच नाही. त्यापुढे ते बँकेच्या नियम-अटीनुसार फेडायचे नाही असा जणू पायंडा कर्जदारांकडून पाडला जात आहे. विशेष म्हणजे या कर्जबुडव्यांना कायद्याचा धाक दाखविण्यास बँकिंग व्यवस्थाही अपुरी पडत असल्याने कर्जबुडव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात या सात राज्यांमध्ये कर्जबुडव्यांची संख्या सुमारे दोन हजार ७६८ इतकी आहे, तर देशभरातील एकूण थकीत कर्जाचे प्रमाण साडेसहा लाख कोटी रुपयांच्या घरात असून, २००८ नंतर वितरीत केले गेलेले तब्बल पाच लाख कोटींच्या थकीत कर्जांची यामध्ये भर पडली आहे. ज्यांच्याकडे देशाचे भाग्यविधाते, बडे उद्योगपती म्हणून पाहिले जाते, त्यापैकीच काही बँकांची लूट करीत असल्याने त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होत आहे. (समाप्त)