Join us  

Hardeepsing Puri: बालाघाटमध्ये पेट्रोल 112 रुपये लिटर, पेट्रोलियममंत्र्यांचा थेट दुबईला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:56 PM

Hardeepsing Puri:पेट्रोल दरवाढीवरुन काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Congress Sachin Pilot) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देसौदी अरब आणि युएईसमोर हरदीपसिंग पुरी यांनी तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी ओपेकच्या प्रमुखा देशांना फोन करुन, ग्राहकांना योग्य दरात पेट्रोल उपलब्ध झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर भाववाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर, मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे पेट्रोल प्रति लिटर 112.41 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळेच, नवीन पेट्रोलियम मंत्र्यांनी थेट दुबईला फोन लावला.

पेट्रोल दरवाढीवरुन काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Congress Sachin Pilot) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत" अशा शब्दांत पायलट यांनी सणसणीत टोला लगावला आहे. सचिन पायलट यांनी गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत असं म्हणत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे नवीन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुबईला फोन करुन चिंता व्यक्त केली आहे. 

सौदी अरब आणि युएईसमोर हरदीपसिंग पुरी यांनी तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी ओपेकच्या प्रमुखा देशांना फोन करुन, ग्राहकांना योग्य दरात पेट्रोल उपलब्ध झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. 

पुरी यांनी ट्विटरवर म्हटले की, सौदी अरबचे ऊर्जामंत्री शहजादे अब्दुल अजीज बिन सलमान अल सऊद यांच्यासमेवत जागतिक ऊर्जा व्यापारात द्विपक्षीय ऊर्जा भागिदारी आणि विकासात्मदृष्टीने सखोल चर्चा झाली. जागतिक तेल बाजारास अधिक विश्वासार्ह आणि स्थीरतापूर्ण बनविण्यासाठी तसेच खनिज तेलांच्या किंमती योग्य करण्यासंदर्भात शहजादे अब्दुल अजीज यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, सौदी अरब हा जगात सर्वाधिक प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात करणारा देश आहे.

शुद्ध तुपापेक्षाही महाग बनलंय पेट्रोल - पायलट

"सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यावर सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत" अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :पेट्रोलमंत्रीडिझेलमध्य प्रदेश