Join us

घसरणीला लगाम; बाजार वधारला

By admin | Updated: August 13, 2015 22:09 IST

गेल्या चार दिवसांपासूनच्या घसरणीला लगाम घालत भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा झाली. बृहद् आर्थिक स्थितीचे समाधानकारक चित्र आणि महागाईचा जोर ओसरल्याने

मुंबई : गेल्या चार दिवसांपासूनच्या घसरणीला लगाम घालत भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा झाली. बृहद् आर्थिक स्थितीचे समाधानकारक चित्र आणि महागाईचा जोर ओसरल्याने व्याजदर कपातीची आशा पल्लवित झाल्याने गुंतवणूकदारांनी निवडक शेअर्सच्या खरेदीवर भर दिल्याने बाजार सावरला गेला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) गुरुवारी दिवसअखेर ३७.२७ अंकांनी वधारत २७,५४९.५३ वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६.४० अंकांनी वर सरकत ८,३५५.८५ वर स्थिरावला.औद्योगिक उत्पादन वाढल्याने गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांवर किमान पर्यायी कर (मॅट) लागू करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही, असे सरकारनियुक्त समितीने म्हटल्याचे वृत्त आल्याने गुंतवणूकदारांना हायसे वाटले. सोबतच जागतिक बाजारातील तेजीचाही भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या चार दिवसांत ७८५.८७ अंकांनी घसरला होता.किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात ३.८ टक्क्यांवर आल्याचे आणि औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी सरकारने काल (बुधवारी) जारी केली होती. तसेच युआनचे मूल्य आणखी घटविण्याचे कोणतेही कारण नाही, अशी ग्वाही चीनच्या केंद्रीय बँकेने दिल्याने गुंतवणूकदारांना धीर आला. तथापि, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू-सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर होऊ न शकल्याने बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने निर्देशांकाने सुरुवातीला घेतलेली झेप अखरेपर्यंत टिकली नाही.