Join us  

जीएसटीचा ९३ टक्के परतावा दिला, ५४०० कोटींची देणी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 4:51 AM

निर्यातदारांना ३१ आॅक्टोबरपर्यंत जीएसटीच्या परताव्याची ८२,७७५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम ८८,१७५ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांच्या ९३.८० टक्के आहे.

नवी दिल्ली - निर्यातदारांना ३१ आॅक्टोबरपर्यंत जीएसटीच्या परताव्याची ८२,७७५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम ८८,१७५ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांच्या ९३.८० टक्के आहे. आता ५४०० कोटी रुपयांची देणी बाकी असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.८२,७७५ कोटी रुपयांपैकी ४२,९३५ कोटी रुपये रक्कम ही एकात्मिक जीएसटीतील (आयजीएसटी) आहे. ही रक्कमसुद्धा एकूण दाव्यांच्या ९३.२७ टक्के आहे. आयजीएसटीतील ३०९६ कोटी रुपयांचे दावे विविध तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित आहेत.या त्रुटी नसत्या तर परताव्याची रक्कम यापेक्षाही अधिक असती, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याखेरीज ५२३९ कोटी रुपयांच्या दाव्यांमधील त्रुटींसंबंधी संबंधित करदात्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे हे दावे लवकरच निकाली लागतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.संपूर्ण देशाला एकाच कररचनेत बांधणारी ‘जीएसटी’ ही जगातील सर्वात मोठी कर प्रणाली आहे. त्यामध्ये इतक्या कमी कालावधित इतक्या मोठ्या प्रमाणातील दावे निकाली लावणे, हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे मोठे यश असल्याचा दावा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय