Join us

जीएसटी विधेयक आज लोकसभेत पारित होणार?

By admin | Updated: April 27, 2015 01:03 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची तरतूद असलेले घटनादुरुस्ती विधेयक उद्या सोमवारी लोकसभेत पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची तरतूद असलेले घटनादुरुस्ती विधेयक उद्या सोमवारी लोकसभेत पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. गत शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १२२ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत चर्चेसाठी सादर केले होते. तथापि, विरोधकांनी जोरदार विरोध करीत हे विधेयक स्थायी समितीकडे सोपविण्याची मागणी केली होती. मात्र, विरोधकांच्या मागणीला दाद न देता सरकारने चर्चा सुरू केली होती. यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग करीत निषेध नोंदविला होता. उद्या सोमवारी विरोधकांच्या विरोधादरम्यान हे विधेयक पारित करण्याचा सरकारचा मनसुबा आहे.घटनादुरुस्ती विधेयक असल्याने हे पारित करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत आवश्यक आहे. अप्रत्यक्ष करांचे जाळे सुटसुटीत करून केंद्राच्या तिजोरीत आणखी भर घालण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी अंमलबजावणीचे सरकारचे लक्ष्य आहे. जीएसटीअंतर्गत कराचा एकच दर लागू झाल्यानंतर तो केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्यांचे मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात, प्रवेश शुल्क, ऐषोराम कर त्याचप्रमाणे वस्तू व सेवावर लागणाऱ्या खरेदी कराची जागा घेईल. यामुळे वस्तू आणि सेवांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज हस्तांतरण होण्यासह इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल. एक एप्रिल २०१६ पासून गुडस् अँड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, आता केंद्र सरकारने हालचाली जोमाने सुरू केल्या आहेत. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सर्व राज्याच्या वित्तमंत्र्यांशी बैठक घेत अनेक वादग्रस्त मुद्यांवर चर्चा करत तोडगा काढण्यात आल्याची माहिती दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)