मुंबई : साबण, शांपू आणि टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत अनेक प्रमुख कंपन्यांनी अलीकडेच मोठी वाढ केली आहे. उत्पादन खर्च वाढला, म्हणून ही वाढ झालेली नसून, वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेसाठी व्यावसायिक धोरण (बिझनेस स्ट्रटेजी) म्हणून ही वाढ करण्यात आली आहे.येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल (पीअँडजी) यांसारख्या कंपन्या त्यासाठी उत्पादन धोरण बदलत आहेत अथवा किमती वाढवित आहेत. भारतातील सर्वांत मोठी ग्राहक वस्तू उत्पादक कंपनी एचयूएलने उत्पादनात वाढ केली आहे. जीएसटीमुळे करांचा बोजा कमी होईल, असा अंदाज बांधून हे धोरण कंपनीने स्वीकारले. पीअँडजीने नेमके याच्या विरुद्ध धोरण स्वीकारले आहे. सूत्रांनी सांगितले की, सध्या नित्योपयोगी वस्तूंच्या किमती वाढविण्यात येत आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर किमतीत कपात करता यावी, यासाठी धोरणाचा भाग म्हणून सध्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील माहीतगारांनी सांगितले की, आपल्या काही उत्पादनांवरील करांचा बोजा जीएसटीमध्ये कमी होईल, असे एचयूएलला वाटते.याचाच अर्थ, कंपनीचा नफा वाढणार आहे. त्यामुळे कंपनीने उत्पादन वाढविले आहे. पीअँडजीने मात्र, रिटेलरांकडे असलेला आपल्या वस्तूंचा साठा घटविला आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या काही वस्तूंचे उत्पादनही कंपनीने घटविले आहे.कर वाढणार की कमी होणार?- जीएसटी व्यवस्थेत बहुतांश वस्तूंवर १८ टक्के कर लागेल, असा अंदाज आहे. एचयूएलच्या मते, वस्तूंच्या किमती त्यामुळे १८ ते २३ टक्क्यांनी कमी होतील. पीअँडजीने २८ टक्के कर गृहीत धरून आपली धोरणे ठरविली आहेत. - एचयूएलने गृहीत धरल्याप्रमाणे जीएसटीमध्ये कर कमी झाल्यास कंपनी आपले उत्पादन कमी करील आणि जीएसटीच्या आधीचा साठा विक्रीला काढील. त्यावर अर्थातच जुने कर लागतील.
जीएसटीआधीच महागाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 04:33 IST