Join us  

सेवा क्षेत्राचा वृद्धी दर वर्षातील उच्चांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:52 AM

देशांतर्गत मागणी वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे मागील महिन्यात सेवा क्षेत्रातील वाढीचा वेग एक वर्षाच्या उच्चांकावर गेला. वास्तविक इनपूट खर्च वाढीचा वेग आठ वर्षांतील उच्चांकावर गेलेला असतानाही सेवा क्षेत्रातील वृद्धी वेगवान झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था गेल्या तिमाहीत ०.४ टक्क्यांची वृद्धी नोंदवून तांत्रिक मंदीतून बाहेर पडली होती. आता आर्थिक घडामोडींतील सुधारणा अधिक वेगवान हाेईल, असा अंदाज आहे.निक्केई व आयएचएस मार्किट यांनी जारी केलेल्या सेवा क्षेत्राचा ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत वाढून ५५.३ अंकांवर गेला. त्याआधी जानेवारीत तो ५२.८ अंकांवर होता. फेब्रुवारी २०२० नंतरचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे मागील पाच महिन्यांपासून पीएमआय ५० अंकांच्या वर आहे. ५० अंकांच्या वरील पीएमआय वृद्धी, तर त्याखालील पीएमआय घसरण दर्शवितो. अहवालात म्हटले आहे की, विदेशी मागणीत सातत्याने घसरण होत असतानाही देशांतर्गत मागणीच्या बळावर सेवा क्षेत्रात वृद्धीने उसळी घेतली आहे. 

सेवा क्षेत्रातील रोजगारात मात्र तीन महिन्यातील सर्वाधिक गतीने कपात झाली आहे. त्यामुळे श्रम बाजारास सुधारण्यास आणखी काही काळ लागेल, असे दिसून येत आहे.

आर्थिक घडामोडी वाढण्याची शक्यताआयएचएस मार्केटच्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, २०२०-२१ वित्त वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक घडामोडी वाढतील, असा अंदाज आहे. मार्चमध्येही वृद्धीची गती कायम राहील, असे दिसून येत आहेे. आर्थिक फेरझेप आणि वस्तू उत्पादन क्षेत्रातील मजबूत सुधारणा यामुळे संपृक्त (कंपोजिट) पीएमआय फेब्रुवारीत ५७.३ अंकावर गेला. हा चार महिन्यांचा उच्चांक ठरला.