Join us  

वृद्धीदर वाढून ६.३ टक्क्यांवर, जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील जीडीपी वाढला : वस्तू क्षेत्रातील आर्थिक घडामोडी गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:54 AM

पाच तिमाहींपासून घसरणीला लागलेला सकल देशांतर्गत उत्पन्नाचा वृद्धीदर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वाढून ६.३ टक्के झाला आहे. वस्तू उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाल्यामुळे वृद्धीदर वाढला आहे.

नवी दिल्ली : पाच तिमाहींपासून घसरणीला लागलेला सकल देशांतर्गत उत्पन्नाचा वृद्धीदर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वाढून ६.३ टक्के झाला आहे. वस्तू उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाल्यामुळे वृद्धीदर वाढला आहे. दरम्यान, आॅगस्ट अखेरीस भारताची वित्तीय तूट वाढून ९६.१ टक्के झाली आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर ५.७ टक्क्यांवर घसरला होता. हा तीन वर्षांचा नीचांक ठरला होता. २०१६-१७ मध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत तो ७.५ टक्के होता. याचाच अर्थ वृद्धीदर अजूनही गेल्यावर्षीच्या पातळीच्या खूपच खाली आहे.केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, वस्तू उत्पादन, वीज, गॅस, पाणीपुरवठा या क्षेत्रातील आर्थिक घडामोडी दुसºया तिमाहीत वाढल्या. या क्षेत्रांत ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. याशिवाय व्यापार, हॉटेल, वाहतूक व दळणवळण आणि प्रसारण यासंबंधीच्या सेवांमध्येही ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहावयास मिळाली. कृषी, वनीकरण आणि मासेमारी या क्षेत्रांतील वृद्धीदर १.७ टक्का राहिला.गेल्यावर्षी नोटाबंदी आणि जुलैमध्ये लागू करण्यात आलेला जीएसटी यामुळे भारताच्या वृद्धीदर घसरणीला लागला होता. या धक्क्यामधून अर्थव्यवस्था आता सावरत आहे, असे दुसºया तिमाहीतील वृद्धीदराच्या वाढीवरून दिसते, असे सूत्रांनी सांगितले. वृद्धीदर घटल्यामुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागत होता.आॅक्टोबरमध्ये गाभा क्षेत्रांचा वृद्धीदर घसरलायंदाच्या दुस-या तिमाहीत जीडीपीमध्ये वाढ झालेली असली तरी आॅक्टोबरमध्ये आठ प्रमुख गाभा क्षेत्रांत घसरण झाली आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ गाभा क्षेत्रांचा एकत्रित वृद्धीदर आॅक्टोबरमध्ये घसरून ४.७ टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या आॅक्टोबरमध्ये तो ७.१ टक्के होता. आधीच्या अंदाजानुसार आॅक्टोबरमध्ये तो ५.२ टक्के प्रस्तावित होता.अजून तीन तिमाहींची वाट पाहा -चिदंबरमजीडीपी वृद्धीदरात झालेल्या वाढीचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी सावधानतेचा इशारा देत म्हटले की, कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी येणा-या तीन तिमाहींच्या आकडेवारीची वाट पाहावयास हवी.चिदंबरम म्हणाले की, पाच तिमाहींपासून सुरू असलेली घसरण थांबली, ही चांगली बाब आहे. तथापि, वृद्धीदर आता वाढीच्या मार्गाला लागला, असा अर्थ यातून लगेच काढता येणार नाही. कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यासाठी आपण आगामी ३ ते ४ तिमाहींची वाट पाहिली पाहिजे.यापुढे आणखी होणार वाढ - जेटलीवित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले की, नोटाबंदी आणि जीएसटी आता मागे पडले असून, येणाºया तिमाहीत वृद्धीदर आणखी वाढेल. पाच तिमाहींपासून सुरू असलेल्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे, असे संकेत जीडीपीच्या ६.३ टक्के वृद्धीदरातून मिळतात.सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून वृद्धीदरात वाढ झाली आहे. आम्ही आधीपासूनच हे सांगत होतो.वृद्धीदरातील वाढ समाधानकारक - अनंतभारताच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख टी.सी.ए. अनंत यांनी सांगितले की, दुसºया तिमाहीतील ६.३ टक्के वृद्धीदर हा समाधानकारक आहे. वृद्धीदराच्या घसरणीचा कल संपल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतसरकार