Join us

ग्रीस संकटाचा परिणाम रुपयावर शक्य -सुब्रमण्यम

By admin | Updated: July 6, 2015 22:59 IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अन्य आर्थिक संस्थांनी ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलेल्या अटी त्याने फेटाळल्या असल्या तरी त्याचे परिणाम भारतावर होऊ शकतात.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अन्य आर्थिक संस्थांनी ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलेल्या अटी त्याने फेटाळल्या असल्या तरी त्याचे परिणाम भारतावर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर भारताने सोमवारी असल्या संकटापासून आम्ही दूर असलो तरी विदेशी गुंतवणूक काढून घेण्यात आली तर त्याचा परिणाम रुपयावर होऊ शकतो, असे म्हटले.केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की,‘‘ते एक नाटक असून आणखी काही दिवस ते चालेल. आम्ही कमीतकमी तीन बाजूंनी सुरक्षित आहोत. आमची बाह्य आर्थिक स्थिती खूपच बळकट आहे. आमच्याकडे परकीय गंगाजळी असून आमची अर्थव्यवस्था आताही गुंतवणुकीचे ठिकाण आहे. म्हणून माझ्या मते आम्ही यातून बचावलेलो आहोत.’’ ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अन्य आर्थिक संस्थांनी ज्या अटी त्याला घातल्या होत्या त्या तेथे रविवारी झालेल्या सार्वमतात नागरिकांनी फेटाळून लावल्या. या कौलामुळे ग्रीसचे युरोझोनमधील सदस्यत्व रद्द होण्याची भीती आहे. सुब्रमण्यम म्हणाले की,‘‘ग्रीसच्या संकटाचा विचार केला तर ते दीर्घकाळपर्यंत चालेल. मंगळवारी जर्मनी आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक होणार आहे. आता युरोप कशी प्रतिक्रिया देतो हे बघायचे आहे.’’ ग्रीस संकटाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय संभाव्य परिणाम होतील असे विचारता अरविंद सुब्रमण्यम म्हणाले की ‘‘अशा प्रकारच्या परिस्थितीत सामान्यत: डॉलर सुरक्षित ठिकाणी जात असतो. याचा परिणाम रुपयावर होऊ शकतो परंतु अजूनपर्यंत असामान्य असे काही घडलेले नाही.’’