Join us  

'सरकारने व्यवसाय सुलभतेसाठी लक्ष पुरवावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:26 AM

टाटा स्टीलच्या नरेंद्रन यांची सरकारला सूचना

जमशेदपूर : उद्योगांना विशेषत: वस्तू उत्पादक (मॅन्युफॅक्चर) क्षेत्रास अधिक स्पर्धात्मक बनविण्यासाठी सरकारने व्यवसाय खर्चावरही लक्ष द्यायला हवे, अशी सूचना टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी केली आहे.नरेंद्रन म्हणाले की, सरकारने व्यवसाय सुलभतेकडे लक्ष पुरविलेच आहे. तसेच आता ‘व्यवसाय खर्चा’कडे लक्ष द्यायला हवे. सध्याच्या बाजार स्थितीत उद्योगांना विशेषत: वस्तू उत्पादन क्षेत्रास अधिक स्पर्धात्मक करणे आवश्यक आहे. आम्ही प्रकल्पाच्या आत व्यावसायिक खर्च नियंत्रणात ठेवतो; पण प्रकल्पाबाहेरच्या गोष्टी आमच्या हातात नसतात. त्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या हातात असतात. त्यामुळे या मुद्द्याकडे सरकारनेच लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेतल्यास देशांतर्गत वस्तू उत्पादन क्षेत्र अधिक स्पर्धात्मक होईल.सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना नरेंद्रन यांनी म्हटले की, २0१९ हे वर्ष पोलाद क्षेत्रासाठी अत्यंत कठीण राहिले. टाटा स्टीलही त्याला अपवाद नाही. आम्हालाही आमची आव्हाने आहेतच. २0१९ च्या शेवटच्या काही महिन्यांत आम्हाला सुधारणांचे संकेत दिसून येत आहेत. पोलादाची मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याबरोबर किमतीही पुन्हा वाढल्या आहेत. मागील सहा महिन्यांत पोलादाचे दर १0 हजार रुपये टनांवर पोहोचले आहेत. (वृत्तसंस्था)गुंतवणूक कायम‘पोलादनगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटानगरच्या विकासाच्या संदर्भात नरेंद्रन यांनी सांगितले की, टाटा स्टीलने आपली बांधिलकी नेहमीच पाळली आहे. कठीण काळातही कंपनीने आपली गुंतवणूक कमी होऊ दिली नाही. कंपनी टिकावी यासाठी तसेच ती नफाक्षम आणि स्पर्धात्मक राहावी यासाठी शहराने त्याग करण्याची गरज आहे.

टॅग्स :टाटा