Join us  

वय कितीही असो, 'या' स्कीममध्ये ५५ वर्षापर्यंत व्हाल कोट्यधीश; ही ट्रिक समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 2:04 PM

कोट्यधीश व्हायचं असेल तर आजपासूनच गुंतवणूकीला सुरुवात करायला हवी. तुम्ही दर महिन्याला काही रक्कम गुंतवू शकता.

तुम्हालाही कोट्यधीश व्हायचं असेल तर आता तुमची वेळ आली आहे. कोट्यधीश व्हायचं असेल तर आजपासूनच गुंतवणूकीला सुरुवात करायला हवी. तुम्ही दर महिन्याला काही रक्कम गुंतवू शकता. पण यासाठी तुम्ही नियमित असलं पाहिजे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणुकीचा फायदा असा आहे की या योजनेमुळे तुम्ही निवृत्तीचं वय होण्यापूर्वीच कोट्यधीश होऊ शकता. जर तुम्ही यात दिलेल्या पद्धतीनं गुंतवणूक करत राहिल्यास वयाच्या ५५ ​​व्या वर्षी तुम्ही कोट्यधीश व्हाल. यासाठी फक्त एक युक्ती वापरावी लागेल. 

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा 

तुम्हाला पीपीएफमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागेल. कारण, दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल आणि तुम्हाला कोट्यधीश बनण्यास मदत करेल. तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. म्हणजे दरमहा १२,५०० रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. आता कोट्यधीश होण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे. 

७.१ टक्के व्याजाचा फायदा 

सर्वप्रथम हे जाणून घ्या की PPF ही केंद्र सरकारची योजना आहे. म्हणजे ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक आहे. अर्थ मंत्रालय या स्कीमचे व्याजदर ठरवते. व्याज दर तिमाहीत मोजले जाते. सध्या ७.१ टक्के दरानं यावर व्याज दिलं जात आहे. यामध्ये गुंतवणूक १५ वर्षांसाठी करावी लागते. जर आपण हिशोब पाहिला तर, १२,५०० रुपये प्रति महिना गुंतवणुकीचे एकूण मूल्य १५ वर्षानंतर ४०,६८,२०९ रुपये होईल. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम २२.५ लाख रुपये असेल आणि व्याज १८,१८,२०९ रुपये असेल. 

कसे बनाल कोट्यधीश? 

  • समजा तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षापासून PPF मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करत आहात.
  • तुम्हाला दरमहा १२,५०० रुपये जमा करावे लागतील. पीपीएफमध्ये १५ वर्षांनी एकूण ४०,६८,२०९ रुपये जमा होतील.
  • इथे तुम्हाला पैसे काढायचे नाहीत, तर एक्सटेन्शची  रणनीती उपयुक्त ठरेल. पीपीएफ ५ वर्षांच्या कालावधीसाठी दोनदा वाढवा.
  • १५ वर्षांनंतर, ५ वर्षांपर्यंत वाढवण्याचा फायदा असा होईल की २० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम ६६,५८,२८८ रुपये होईल.
  • २० वर्षांच्या मुदतीनंतर, आणखी ५ वर्षांसाठी गुंतवणूक वाढवा. २५ वर्षांनंतर रक्कम १,०३,०८,०१५ रुपये होईल. म्हणजेच तुम्ही कोट्यधीश व्हाल. 

आणखी कोणती पद्धत? 

जर तुम्ही एका महिन्यात १२५०० रुपये गुंतवू शकत नसाल तर थोडे कमी करा. पण जर तुम्हाला वयाच्या ५५ ​​व्या वर्षी कोट्यधीश व्हायचं असेल तर तुम्हाला थोडं आधी सुरुवात करावी लागेल. 

  • वयाच्या २५ व्या वर्षी पीपीएफमध्ये दरमहा १० हजार रुपये गुंतवण्यास सुरुवात करा.
  • ७.१ टक्के दरानं, १५ वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण ३२,५४,५६७ रुपये असतील.
  • आता त्याला ५-५-५ वर्षांची मुदतवाढ द्या. २० वर्षांनंतर त्याचं एकूण मूल्य ५३,२६,६३१ रुपये असेल.
  • ते पुन्हा ५ वर्षांसाठी वाढवा, २५ वर्षांनंतर एकूण मूल्य ८२,४६,४१२ रुपये होईल.
  • ते पुन्हा ५ वर्षांसाठी वाढवा, ३० वर्षांनंतर एकूण मूल्य १,२३,६०,७२८ रुपये होईल.
  • वयाच्या ५५ ​​व्या वर्षी तुम्ही या वेळीही कोट्यधीश झाला असाल.
टॅग्स :पीपीएफगुंतवणूकसरकार