Join us

व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरला कंटाळलेल्यांसाठी खूशखबर

By admin | Updated: March 16, 2017 12:55 IST

व्हॉट्स अॅपच्या नवीन 'स्टेटस' फीचरपासून कंटाळलेल्या, फीचरच न आवडलेल्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच जुने 'टेक्स्ट स्टेटस फीचर' तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - व्हॉट्स अॅपच्या नवीन 'स्टेटस' फीचरपासून कंटाळलेल्या, फीचरच न आवडलेल्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच जुने 'टेक्स्ट स्टेटस फीचर' तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपने 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त नवं स्टेटस फीचर आणलं होतं. मात्र, अपडेट झालेले अॅप फारसं न आवडल्याने अनेकांनी नाकं मुरडली. 
 
''म्हणजे आम्ही आता काय दर 24 तासांनी सारखं स्टेटस अपडेट करत बसाययं का?'', अशा आणि यासारख्या अनेक प्रतिक्रिया युजर्सकडून येऊ लागल्या. 
 
युजर्सकडून मिळणा-या नकारात्मक प्रतिसादामुळे व्हॉट्स अॅप आता जुने स्टेटस फीचर पुन्हा आणणार आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस फीचर सुरूदेखील करण्यात आलं आहे.  मात्र आता पुढील आठवड्यापासून अँड्रॉईड युजर्सही जुनं फीचर पुन्हा एकदा वापरू शकरणार आहेत. यानंतर आय-फोन युजर्ससाठीही व्हॉट्स अॅपचं जुनं फीचर उपलब्ध केले जाईल. 
 
कंपनीकडून सांगण्यात आले की, 'आम्ही युजर्ससोबत संवाद साधला. युजर्संना जुने स्टेटस फीचर हवंय. यासाठी आम्ही प्रोफाइल सेटिंग्समध्ये अबाऊट (About) चे सेक्शन जोडले आहे. About या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे स्टेटस टाईप करुन अपलोड करायचे आहे. या ऑप्शनमुळे तुम्हाला आधीच्या स्टेटस फीचरप्रमाणे स्टेटस अपडेट करणं शक्य होणार आहे. शिवाय आम्ही सध्या आम्ही अशा फीचरवरही काम करत आहोत, ज्याद्वारे युजर्स मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत आपले फोटो, व्हिडीओ आणि GIF शेअर करू शकतील'. 
 
विशेष म्हणजे, व्हॉट्स अॅपचे जुने फीचर स्टेटस जरी पुन्हा येणार असले तरी 'स्टेटस स्टोरीज' फीचर मात्र कायम राहणार आहे. ते हटवलं जाणार नाही. 
 
बीटा कसं वापराल- 
नवं फीचर वापरण्यासाठी 2.14.95  बीटा व्हर्जनसाठी बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करावी लागेल, त्यानंतर प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर टच करावं. त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा प्रोफाइल फोटो, मोबाइल नंबर आणि जुनं स्टेटस About  या नावाने दिसेल.  जुन्या स्टेटसवर टच केल्यास तुम्हाला आधी वापरलेले सर्व जुने स्टेटसही दिसतील. स्टेटसवर टच करून तुम्ही आधीप्रमाणे नवं स्टेटस टाकू शकतात.