नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आयातीवरील निर्बंध मागे घेतल्यानंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ८०० रुपयांनी कोसळला. नऊ महिन्यांच्या या नीचांकामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा २८,५५० रुपयांवर आला. कमजोर मागणी आणि जागतिक बाजारातील नरमीचा कल याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. दुसरीकडे चांदीचा भाव ५० रुपयांनी स्वस्त होऊन प्रतिकिलो ४१,६५० रुपये झाला. बाजारातील जाणकारांच्या मते, रिझर्व्ह बँकेने परदेशातून सोने आयात करण्यावरील निर्बंध उठविल्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा परिणाम बाजार धारणेवर दिसून आला. परिणामी, स्टॉकिस्टांकडून मागणी घटली. आरबीआयने बँकांशिवाय काही खासगी संस्थांनाही सोन्याची आयात करण्याची परवानगी दिली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या पावलामुळे सोन्याच्या पुरवठ्यात वाढ होईल आणि स्थानिक बाजारात या मौल्यवान धातूच्या भावात घसरण होईल, असे मानले जात आहे. तयार चांदीचा भाव ५० रुपयांनी कमी होऊन ४१,६५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही २१० रुपयांनी कोसळून ४०,९९० रुपये प्रतिकिलोवर आला. दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८०० रुपयांनी घसरून अनुक्रमे २८,५५० आणि २८,३५० रुपये प्रतितोळा झाला. गेल्या ८ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावाने ही पातळी गाठली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खुशखबर! लग्नसराईत सोने स्वस्त
By admin | Updated: May 23, 2014 01:37 IST