ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. २७ - भाजपाच्या केंद्रातील चांगल्या कामगिरीमुळे नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील गडगडणा-या कच्च्या तेलाच्या भावांमुळे भारतामध्ये अच्छे दिन येण्याची लक्षणे असून पेट्रोल व डिझेलचे भाव आणखी घसरतील असे संकेत आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर चार वर्षातल्या नीचांकावर आहेत. काही वर्षे प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त भाव राहिलेल्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल ७६.३० डॉलर एवढा घसरला आहे. तेलउद्पादक देशांची म्हणडे ओपेक देशांची या प्रश्नावर महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीमध्ये जास्त भाव मिळण्यासाठी तेलाचे उत्पादन घटवण्याचा आमचा अजिबात विचार नसल्याचे सौदी अरेबिया, कुवेत, कतार व संयुक्त अरब अमिराती या देशांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे भाव आणखी गडगडत प्रति बॅरल ६० डॉलरच्या घरात जातील असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जूनपासून गेल्या सहा महिन्यांमध्ये कच्च्या तेलाचे भाव घसरले आणि भारतातही पेट्रोल व डिझेलचे भाव त्याप्रमाणात कमी झाले. ही घसरण यापुढेही सुरू राहणार असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव भारतातही कमी होतील अशी आशा आहे.
चीन व अमेरिका या बड्या देशांची तेलाच्या आयातीची गरज कमी होत असल्यामुळेही तेलाचे भाव घसरत असल्याचे निरीक्षण काही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. अमेरिकेने साठवलेले कच्चे तेल गेल्या आठवड्यामध्ये १९ लाख बॅरल एवढा झाले असून हे तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ४.७ लाख बॅरल्सनी जास्त आहे. तर चिनी सरकारनेही अत्यंत पद्धतशीरपणे जागतिक बाजारात घसरलेल्या तेलाच्या भावांचा फायदा घेत एक महिना पुरेल एवढा तेलाचा साठा करून ठेवला आहे. दोन्ही बड्या देशांच्या या चातुर्यामुळे त्यांच्याकडून नजीकच्या भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर तेलाची उचल होणार नाही, आणि त्यात भर म्हणजे ओपेक देशही तेलाचे उत्पादन कमी करणार नाहीत, परिणामी कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरतील अशी शक्यता आहे.