मुंबई : सोन्याच्या किमतीत आणखी घसरण अपेक्षित असून नजीकच्या काळात ही किंमत २३ हजार ५०० रुपयांपर्यंत (प्रति तोळा) खाली घसरेल, असा अंदाज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएसनचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी वर्तविला आहे. तसेच, सध्या जरी घसरणीचा हा ट्रेन्ड असला तरी हीच सोन्याती गुंतवणुकीची संधी मानावी कारण पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती प्रति तोळा ३० हजार रुपयांचा टप्पा पार करतील, असे भाकितही त्यांनी वर्तविले आहे.मोहित कम्बोज म्हणाले की, चीनने मोठ्या प्रमाणावर राखीव सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, बड्या गुंतवणूकदारांनी सोन्यातून भांडवली बाजाराकडे गुंतवणूक वळविली आहे. त्यामुळे सोने घसरत आहे. गेल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या किमती तब्बल २७ टक्क्यांनी घसरून ३४ हजार रुपये प्रति तोळा या पातळीवरून २४,७०० रुपये प्रति तोळा या पातळीपर्यंत आले आहेत. आधीच सोने आणि ज्वेलरी उद्योगाला मंदीचा सामना करावा लागत असताना त्यात आता या किमतीत घसरण झाल्याने याचा मोठा ताण या उद्योगाला सहन करावा लागत आहे. सोन्याच्या किमतीमधील घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकही तितकेसे उत्सुक नसल्याचे निरिक्षण कम्बोज यांनी नोंदविले. चांदीही २00 रुपयांनी कोसळलीनवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि ज्वेलरांची कमी खरेदी यामुळे सोन्याचा भाव बुधवारी सलग चौथ्या दिवशी घसरला. चार मेट्रो शहरांपैकी एक असलेल्या कोलकात्यात सोन्याचा भाव २४ हजारांच्या खाली आला आहे. राजधानी दिल्लीत सोने ३00 रुपयांनी उतरून २५,२५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही २00 रुपयांनी घसरून ३४,१00 रुपये किलो झाला. औद्योगिक क्षेत्राकडून तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेल्या मागणीत घट झाल्याचा फटका चांदीला बसला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, न्यूयॉर्क येथील सोन्याच्या बाजारात सलग १0 व्या दिवशी किमतीत घसरण झाली. गोल्डमॅन सॅशने त्यात आणखी घट होण्याचे भाकीत केले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. जागतिक बाजारात सोने घसरणीमागील हे प्रमुख कारण आहे. जागतिक बाजारात मंगळवारी सोने १.३ टक्क्यांनी घसरून १,0८९.७0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.७ टक्क्यांनी घसरून १४.७३ डॉलर प्रति औंस झाली. पश्चिम बंगालची राजधानी कोलकता येथे बुधवारी सोन्याचा भाव २४ हजारांच्या खाली आला. तेथे २२ कॅरेटच्या सोन्याच्या भावात २३५ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे हे सोने २३,९८५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. हा गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक नीचांकी भाव ठरला आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ३00 रुपयांची घटून २४,८२0 रुपये तोळा झाला. हैदराबाद शहरात २२ कॅरेट सोन्याचा भाव १0८ रुपयांनी घसरून २४,६८९ रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने साडेतेवीस हजार रुपयांपर्यंत घसरणार !
By admin | Updated: July 22, 2015 23:46 IST