Join us

खरेदी ओसरल्याने सोने-चांदीत घसरण

By admin | Updated: April 18, 2015 00:06 IST

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा जोर ओसरल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात घसरणीचा कल राहिला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा जोर ओसरल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात घसरणीचा कल राहिला. आज सोन्याचा भाव ९० रुपयांच्या घसरणीसह २६,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांनी कमी खरेदी केल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी घटून ३६,९०० रुपये प्रतिकिलो राहिला. बाजार सूत्रांच्या मते, जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची मागणी कमी झाली. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. देशांतर्गत बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.३१ टक्क्यांच्या घसरणीसह ११९७.८० डॉलर आणि चांदीचा भाव ०.२५ टक्क्यांनी घटून १६.२७ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह ३६,९०० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही २३० रुपयांनी घटून ३६,४४० रुपये प्रतिकिलोवर आला. मर्यादित व्यवहारामुळे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ९० रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे २६,९९० रुपये आणि २६,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.