नवी दिल्ली : अनुकूल जागतिक वातावरण आणि आगामी लग्नसराईत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शुक्रवारी येथे सोन्याचे भाव १० ग्रॅममागे ४५ रुपयांनी वधारून २६,४६० रुपये झाले.दुसरीकडे चांदीशी निगडित उद्योग आणि नाणे उत्पादकांकडून मागणी नसल्याने चांदी किलोमागे ५० रुपयांनी घसरून ३५,२०० रुपये प्रति कि. असा भाव झाला.सोन्यासाठी जागतिक स्तरावर सकारात्मक वातावरणाचा अंदाज आल्यामुळे येथील बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यातच आता लवकरच लग्नसराई सुरू होणार आहे. या काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने सोन्याचे भाव सावरले आहेत.राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के सोने प्रत्येकी ४५ रुपयांनी सावरले. या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे दर अनुक्रमे २६,४६० आणि २६,३१० रुपये झाले. यापूर्वी गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर ४२५ रुपयांनी घसरले होते. चांदीच्या नाण्याचे भाव मात्र स्थिर राहिले. या नाण्याच्या खरेदीचा दर प्रति १०० नाण्यांमागे ५१ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५२ हजार रुपये राहिला.शेअर बाजारात शुक्रवारी घसरण झाली. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या खरेदीत वाढ झाली. त्याचा लाभ मिळून किमती वाढल्या.
खरेदीमुळे सोने चकाकले; चांदीचा भाव मात्र घसरला
By admin | Updated: September 12, 2015 03:34 IST