Join us  

सोने @71,000 रुपये, पण का?; जाणून घ्या कसा ठरतो सोन्याचा दर? 

By पुष्कर कुलकर्णी | Published: April 07, 2024 9:53 AM

असा ठरतो सोन्याचा दर? 

डॉ. पुष्कर कुलकर्णीगुंतवणूक विश्लेषक

सोन्याची झळाळी ७० हजार पार झाली आहे. सोन्याचे वाढते दर गुंतवणूकदारांना खुश करीत असतात. मात्र, ज्यांना लग्नसराईनिमित्त सोने खरेदी करायचे असते, त्यांना मात्र डोकेदुखीचा विषय ठरतो. ऐन लग्नसराईतच का वाढतो सोन्याचा दर? का लग्न आहेत म्हणून सुवर्णकार मंडळी वाढवतात भाव? असे एक ना अनेक प्रश्न सोने खरेदीदारांना पडत असतील. चला... त्याची उत्तरे शोधू या. 

असा ठरतो सोन्याचा दर? सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रती औंस अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो.जगभरात सोन्याचे एकूण उत्पादन आणि मागणीवर हा दर ठरतो.भारतीय सणवार आणि लग्नसराई याचा भावाशी फारसा संबंध नसतो.

भारतात का वाढला सोन्याचा भाव? भारतीय रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले. सोप्या शब्दात डॉलर महाग झाला. सोन्याचा दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरत असल्याने गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रती औंस डॉलरमध्ये बरीच वाढ झाली. भरीस भर याच दहा वर्षांत भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घटल्याने प्रति औंस सोन्याचा दर भारतात मोठ्या प्रमाणात वाढला. एकूणच इतिहास पाहता भारतात सोन्याचा भाव हा या सूत्रानुसार वाढत गेल्याचे दिसते.

गुरुपुष्य योग  आता सोने डिजिटल स्वरूपात खरेदी करता येते. कधीही, केव्हाही. विकता येते कधीही, केव्हाही. पूर्वी गुरुपुष्य योगावर मुहूर्त साधत एक- एक ग्रॅम सोने खरेदी केले जायचे. बँकेत लॉकरमध्ये ठेवून जेव्हा गरज असेल तेव्हा दागिने करणे किंवा विकणे, असे होत असायचे. आताही होते.

साेने सांभाळायची जोखीम लक्षात घेता पेपर गोल्ड या संकल्पनेतूनही हे करता येते. जेव्हाचे तेव्हा पाहू, असा विचार केल्यास सोने महागच मिळणार. सोने हा एक मौल्यवान धातू आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने भाव वाढतच राहणार.प्रत्येक महिन्यात थोडेथोडे खरेदी केले तर भविष्यात ग्रॅम- ग्रॅम साठून अनेक तोळे साठेल. गुंतवणूक म्हणून किंवा लग्नात आवश्यक म्हणून नक्कीच उपयोगी पडेल.

डॉलर आणि रुपयाचे मूल्य महत्त्वाचेभारतातील सोन्याचा भाव हा डॉलर आणि रुपया याच्या विनिमयाचा दर यावर अवलंबून असतो.१ एप्रिल २०१४ रोजी सोन्याचा भाव १,३०० डॉलर प्रती औंस इतका होता. भारतात २९ हजार रुपये प्रती तोळा.१ एप्रिल २०२४ रोजी हाच भाव २,२६० डॉलर प्रती औंस इतका झाला. यामुळे भारतात रुपयांमध्ये भाव ६९,००० रुपये प्रती तोळा इतका झाला.

एकूण दहा वर्षांत डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या भावात 

७४% वाढ झाली. 

भारतीय बाजारात हाच भाव १४० टक्क्यांनी वाढला. 

याचे एकमात्र कारण म्हणजे २०१४ साली एका डॉलरला भारतीय ६१ रुपये मोजावे लागायचे आणि आता दहा वर्षांनंतर त्याच एका डॉलरला ८३ रुपये मोजावे लागतात.

टॅग्स :सोनंव्यवसाय