Join us

सोन्याला धनतेरस लाभली

By admin | Updated: October 22, 2014 05:31 IST

औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने चांदीचा भावही १५० रुपयांच्या तेजीसह ३९,००० रुपये प्रतिकिलो राहिला

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आभूषण विक्रेत्यांसोबतच किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याला नवी झळाळी मिळाली. मंगळवारी सोन्याचा भाव १५० रुपयांच्या तेजीसह २७,९२५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने चांदीचा भावही १५० रुपयांच्या तेजीसह ३९,००० रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी असल्याचा ग्राहकांनी मोठा लाभ उठवला.सराफा व्यापाऱ्यांच्या मते, हिंदू परंपरेत ‘धनत्रयोदशी’ दिवशी मौल्यवान धातूंची खरेदी शुभ मानली जाते. याप्रसंगी झालेली सांकेतिक खरेदी व विदेशी बाजारातील मजबूत कल यामुळे ग्राहकांच्या उत्साहात भर पडली. परिणामी या मौल्यवान धातूंच्या खरेदीने जोर धरला.दिल्लीतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्याच्या मागणीत वाढ नोंदली गेली. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशी दिवशी सोन्याचा भाव ३१,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम होता.दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५० रुपयांच्या तेजीसह २७,९२५ रुपये व २७,७२५ रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला. काल यात ७५ रुपयांची वाढ झाली होती. तथापि, मर्यादित व्यवहारामुळे आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,३०० रुपयांवर कायम राहिला.तयार चांदीचा भाव १५० रुपयांनी वधारून ३९,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६५ रुपयांनी वाढून ३८,७१५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दुसरीकडे सणासुदीची मागणी असतानाही चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६९,००० रुपये व विक्रीसाठी ७०,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)