Join us  

सोने खरेदी करावे? तुम्ही यात गुंतवणूक करता का? पिवळा धातू उत्तरोत्तर अमूल्यच राहणार

By पुष्कर कुलकर्णी | Published: October 22, 2023 11:11 AM

मुद्द्याची गोष्ट : दहा-बारा वर्षांपूर्वी रुपये तीस बत्तीस हजार तोळा या दरात मिळणारे सोने आता साठ हजारांच्या घरात आहे ना? सोने हा एक मौल्यवान धातू आहे. जगात याचे साठे मर्यादित आहेत. यामुळे हा पिवळा धातू उत्तरोत्तर अमूल्यच राहणार. तुम्ही यात गुंतवणूक करता का?

डॉ पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण. पावित्र्याचा आणि तितकाच आनंदाचा. आपट्याची पाने सोने म्हणून लुटताना सोने खरेदीही तितक्याच जोमाने होत असते. भारतात सोन्यामधील गुंतवणूक ही नफा वसुली कमी तर भावनिक जास्त आहे. सोन्याचे दागिने घेतले की मोडणे अगदी जीवावर येते महिलांना. आणि जर मोडायचेच असतील तर नवीन खरेदीसाठी किव्वा अगदीच पैशांची निकड असेल तरच. पण आता आता याला अपवाद पाहायला मिळतो. सोन्याची खरेदी गुंतवणूकदार भविष्यातील नफा या अपेक्षेने करताना दिसतात. यात प्रत्यक्ष सोने खरेदी कमी कागदावरील सोने खरेदी जास्त असते. सोने खरेदीचे विविध पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष सोने धातू स्वरूपात खरेदी करणे, गोल्ड बॉण्ड खरेदी करणे आणि गोल्ड फंड / ईटीएफ माध्यमातून खरेदी. सोन्याचे भाव नेमके कधी आणि कसे  वाढतात हे लक्षात घ्या.

सोन्याचे भाव वाढण्याची करणे.

१. जागतिक अस्थिरता - जेव्हा जेव्हा जगात दोन देशांत युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते आणि प्रत्यक्ष युद्ध सुरु होते तेव्हा एकप्रकारचे अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत असते. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीवर होतो आणि एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील खरेदी वाढते. यामुळे भाव वाढतो. सध्या इजराईल - हमास युद्धात सोन्याचे भाव वाढलेले आपण पहिलेच आहे.

२. मंदीसदृश परिस्थिती - जागतिक पातळीवर एकूणच मंदीसदृश परिस्थतीचा अंदाज येताच सोन्यातील गुंतवणूक वाढलेली दिसते. सन २००८ ते २०१० या काळात मंदीच्या फेऱ्यात अनेक देश अडकले होते. या दरम्यान सोन्याचे भाव वाढले होते. ही वाढ सन २०१२ पर्यंत टिकून होती.

३. डॉलर रुपया देवाणघेवाण भाव - आंतराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव हे अमेरिकन डॉलर मध्ये मोजले जातात. यामुळे भारतात सोन्याचा भाव ठरविताना रुपया आणि डॉलर यातीलदेवाणघेवाणीचा जो दर असतो तो ग्राह्य धरला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दहा वर्षांपूर्वी एक अमेरिकन डॉलर भारतीय चलनात ६२ रुपयांना मिळत होता. आज रोजी एका डॉलरला ८४ रुपये मोजावे लागतात. म्हणजेच डॉलरचा दर तब्बल ३४ टक्क्यांनी वाढला. याचा परिणाम सोन्यातील भाव वाढीवर सुध्दा झाला. आणि सोने त्यानुसार महाग झाले.

४. सोन्याची मागणी: आंतराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढली तर भाव वाढतो. जसे आपण दागिने स्वरूपात सोने खरेदी करतो तसेच अनेक देश सोन्याची खरेदी करून ठेवत असतात. औद्योगिक स्तरावर सुध्दा सोने वापरले जाते आणि तेथूनही मागणी वाढत असते. जेव्हा उत्पादन मर्यादित असते आणि मागणी वाढीव असते तेव्हा भाव वाढतात. आणि उलट जेव्हा उत्पादन जास्त असते आणि मागणी कमी असते तेव्हा भाव उतरत असतात.

भारतात सोन्याच्या भावात वाढच झालेली दिसते

गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला तर भारतात सोन्याचा भावात वाढच झालेली दिसते. याला वरील चार कारणे जबाबदार आहेत. यामुळे ज्यांनी ज्यांनी जेव्हा जेव्हा सोने खरेदी केले आहे आणि पुढील काही वर्षे ठेवले आहे त्यांना  काहीच नुकसान झाले नाहीये. उलट फायदाच झाला आहे.

या दसऱ्याला जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर बिनधास्त घ्या. एकूणच इतिहास पहिला तर आज खरेदी केलेल्या सोन्याला उत्तरोत्तर झळाळी मिळणार अशी साकारात्मक आशा ठेवायला काहीच हरकत नाही. दहा बारा वर्षांपूर्वी रुपये तीस बत्तीस हजार तोळा या दारात मिळणारे सोने आज रोजी साठ हजारांच्या घरात आहे ना? सोने हा एक मौल्यवान धातू आहे. जगात याचे साठे मर्यादित आहेत. यामुळे हा पिवळा धातू उत्तरोत्तर अमूल्यच  राहणार.

टॅग्स :सोनंगुंतवणूक