Join us

लग्नसराईच्या मागणीने सोन्याचा भाव वधारला

By admin | Updated: February 26, 2015 00:22 IST

सलग चार दिवसांच्या घसरणीला राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी लग्नसराईच्या मागणीने लगाम बसला. आज सोन्याचा भाव

नवी दिल्ली : सलग चार दिवसांच्या घसरणीला राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी लग्नसराईच्या मागणीने लगाम बसला. आज सोन्याचा भाव १०० रुपयांच्या तेजीसह पुन्हा २७ हजारांची पातळी ओलांडत २७,०७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात ही तेजी दिसून आली. चांदीचा भावही ५०० रुपयांनी बळकट होऊन ३७,३०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण विक्रेते व किरकोळ व्यापारी यांच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या भावात ही तेजी नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,०७० रुपये आणि २६,८७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या चार दिवसांत ३१५ रुपयांची कपात झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव ५० रुपयांनी वाढून २३,६० रुपये झाला. तयार चांदीचा भाव मागणी वाढल्याने आणखी ५०० रुपयांनी वाढून ३७,३०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४३५ रुपयांच्या तेजीसह ३६,६८० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी उंचावून खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीकरिता ६०,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)