Join us

सोन्याचा भाव तब्बल ४०० रुपयांनी घसरला

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

जागतिक बाजारातील घसरणीचा कल आणि आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून असलेली मागणी घटल्याने गुरुवारी राजधानी

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीचा कल आणि आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून असलेली मागणी घटल्याने गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याच्या भावाने आठवड्याचा नीचांक गाठला. आज सोन्याचा भाव ४०० रुपयांनी घसरून २६,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे चांदीचा भावही १,३५० रुपयांनी घटून ३६,६५० रुपये किलो राहिला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावातही घट नोंदली गेली आहे. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते त्यांच्या मागणीत चांगलीच घट झाली. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. परिणामी, स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव आठवडाभराच्या नीचांकावर पोहोचला. देशांतर्गत सराफ्याचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.८ टक्क्यांनी घटून १.१९२.७४ डॉलर प्रतिऔंस झाला. हा गेल्या १ एप्रिलपासूनचा नीचांक आहे. चांदीचा भावही १.८ टक्क्यांनी कोसळून १६.२३ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. चांदीच्या भावाची ही २० मार्चपासूनची नीचांकी पातळी आहे. तयार चांदीचा भाव १,३५० रुपयांनी कोसळून ३६,६५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १,२७० रुपयांच्या घसरणीने ३६,४५० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही २,००० रुपयांनी कोसळून खरेदीसाठी ५५,००० रुपये व विक्रीकरिता ५६,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)