Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या दराची ३० हजारांकडे झेप

By admin | Updated: February 26, 2016 03:17 IST

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांकडून खरेदी यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात सोने १८५ रुपयांनी वधारून २९,२८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांकडून खरेदी यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात सोने १८५ रुपयांनी वधारून २९,२८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदीही १५० रुपयांनी वधारून ३७,२५० रुपये प्रति किलो झाली.अमेरिकेतील फेडरल बँकेचे व्याजदर खूपच कमी असून हेच दर प्रदीर्घ काळ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सोन्यात तेजी आली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला उठाव आहे, असे सराफातर्फे सांगण्यात आले.जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोने ०.९ टक्क्याने वधारून १,२३९.३१ डॉलर प्रति औंस झाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव १८५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २९.२८५ रुपये आणि २९,१३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. बुधवारी सोने १९० रुपयांनी वाढले होते. लग्नसराईसाठी होणारी मागणी ध्यानात घेऊन सराफा सोन्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोन्यात तेजी आल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. कारखानदार आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीही १५० रुपयांनी वधारून ३७,२५० रुपये प्रति किलो झाली.