Join us

सोन्याचा भाव २७ हजारांखाली

By admin | Updated: June 24, 2015 00:27 IST

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ५० रुपयांच्या घसरणीसह २६,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. ही गेल्या दोन आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. तथापि, सध्याच्या पातळीवर औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून किरकोळ मागणी झाल्याने चांदीचा भाव १०० रुपयांच्या सुधारणेसह ३६,९५० रुपये प्रतिकिलो झाला.बाजार सूत्रांच्या मते, जागतिक बाजारातील कमजोर कल हा सोन्याच्या भावातील घसरणीमागचे मुख्य कारण राहिले. अनेक महिन्यांनंतर ग्रीस आणि त्यांच्या कर्जदात्यांत समेट होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यामुळे या मौल्यवान धातूच्या मागणीत घट झाली. कारण संकटाच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याला अधिक प्राधान्य देतात. याशिवाय भांडवल प्रवाह वळता झाल्यानेही बाजार धारणेवर परिणाम झाला, असे सूत्रांनी सांगितले.दुसरीकडे तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या सुधारणेसह ३६,९५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १०५ रुपयांनी वधारून ३६,६६० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ५४,००० रुपये व विक्रीसाठी ५५,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)