Join us

सोन्याच्या भावाने गाठला दोन महिन्यांचा नीचांक

By admin | Updated: June 24, 2015 23:51 IST

सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशीही घसरणीचा कल कायम राहिला. कमजोर जागतिक कल आणि आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर स्थानिक

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशीही घसरणीचा कल कायम राहिला. कमजोर जागतिक कल आणि आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव १६० रुपयांनी कोसळून २६,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. ही गेल्या दोन महिन्यांची नीचांकी पातळी आहे. दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या कमजोर मागणीमुळे चांदीचा भावही ५५० रुपयांच्या आपटीसह ३६,४०० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजार सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेच्या आर्थिक विकासाची आकडेवारी प्रसिद्ध होण्याच्या चर्चेचा बाजारात जोर असून यंदा अमेरिकी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्रीस आपल्या कर्ज संकटातून वाचण्याची शक्यता वाढल्याने जागतिक बाजारात व्यापार धारणा कमजोर राहिली. यामुळे स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आपटला. याशिवाय शेअर बाजारात भांडवल प्रवाह वळल्यानेही मौल्यवान धातूच्या भावात घसरण झाली.राजधानी नवी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १६० रुपयांनी घटून अनुक्रमे २६,७९० रुपये व २६,६४० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. गेल्या चार सत्रांत सोन्याच्या भावात आतापर्यंत ४१० रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,३०० रुपयांवर कायम राहिला.सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव ५५० रुपयांच्या घसरणीसह ३६,४०० रुपये प्रतिकिलो आणि साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५५० रुपयांनी घटून ३६,११० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५४,००० रुपये व विक्रीकरिता ५५,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)