Join us

सोन्याच्या किमतीला मिळाली नवी झळाळी

By admin | Updated: January 29, 2015 01:09 IST

गेले दोन दिवस घसरणा-या सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा उचल घेतली असून, नवी दिल्ली बाजारपेठेत सोन्याच्या किमती १० ग्रॅममागे १२० रुपयांनी वाढल्या

नवी दिल्ली : गेले दोन दिवस घसरणा-या सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा उचल घेतली असून, नवी दिल्ली बाजारपेठेत सोन्याच्या किमती १० ग्रॅममागे १२० रुपयांनी वाढल्या आहेत. लग्नाचा मोसम व ज्वेलर्सकडून वाढती मागणी यामुळे सोने बुधवारी २८,४२० रुपयांना १० ग्रॅम या दराने विकले गेले. चांदीची किंमतही वाढली असून, किलोमागे १२० रुपयांची वाढ नोंदवत चांदी ३९,५२० रुपये किलो दराने विकली गेली. लग्नाचा मोसम असल्याने सोन्याच्या किरकोळ ग्राहकीत तसेच सराफी खरेदीतही वाढ झाली. स्थानिक बाजारात सोन्या, चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरीही जागतिक बाजारपेठेत मात्र सोन्याच्या किमतींना फारसा उठाव नव्हता. अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीआधी जागतिक बाजारात थोडे तणावाचे वातावरण होते, त्याचा परिणाम मौल्यवान वस्तूंच्या किमतीवर झाला. सिंगापूरमध्ये सोन्याच्या किमती ०.३ टक्क्याने उतरल्या, तर चांदीच्या किमतीत ०.२ टक्का घसरण झाली. सोन्याची किंमत दर औसामागे १,२८८.६५ डॉलर अशी राहिली तर चांदी दर औसामागे १८.०२ डॉलर किमतीला विकली गेली.