नवी दिल्ली : सराफा बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ३२0 रुपयांनी कोसळून २५,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदीचा भाव ३४ हजारांच्या खाली आला आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती आता पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत.जागतिक बाजारातील घसरण, तसेच स्थानिक बाजारांत ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदार यांनी बाजाराकडे फिरविलेली पाठ यामुळे मौल्यवान धातूंचे भाव घसरले आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे बाजार घसरत आहे. जागतिक बाजारांपैकी सिंगापूर येथे सोन्याचा भाव १.२ टक्क्यांनी घसरून १,0७७.४0 डॉलर प्रति औंस झाला. ११ फेब्रुवारी २0१0 नंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. चांदीचा भाव १.१ टक्क्यांनी घसरून १४.५0 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या वर्षी डिसेंबरनंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे.राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३२0 रुपयांनी घसरून २५,0५0 रुपये आणि २४,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. वायदे बाजारात सोन्याचा भाव १९३ रुपयांनी अथवा 0.७७ टक्क्यांनी घसरून २४,७५८ रुपये प्रति १0 ग्रॅम असल्याचे दिसून आले. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव ३00 रुपयांनी घसरून २२,२00 रुपये झाला. काल सोन्याचा भाव १२0 रुपयांनी वाढला होता. ज्वेलरांनी खरेदी वाढविल्याचा लाभ काल सोन्याला झाला होता. आज मात्र ज्वेलरांनी पुन्हा एकदा हात आखडता घेतला. सोन्याच्या पावलावर पाऊल टाकून चांदी घसरून ३४ हजारांच्या खाली आली. चांदीचा भाव ३८0 रुपयांनी कोसळून ३३,९५0 रुपये किलो झाला. २९ सप्टेंबर २0१0 नंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी भाव ३३,७५0 रुपयांवर होता. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३५५ रुपयांनी घसरून ३३,७४५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ४८ हजार रुपये आणि विक्रीसाठी ४९ हजार रुपये प्रति शेकडा झाला.. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने पाच वर्षांच्या नीचांकावर
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST