नवी दिल्ली : जागतिक बाजारातील बळकटीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी तेजीचा कल राहिला. आज सोन्याचा भाव २४० रुपयांनी वधारून २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या महिनाभराच्या उच्चांकावर पोहोचला. जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केल्याने ही भाववाढ नोंदली गेली आहे. औद्योगिक संस्था व नाणे निर्माते यांची मागणी वधारल्याने चांदीचा भावही ९०० रुपयांनी वाढून ३८,५०० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजार जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात तेजीचा कल राहिला. परिणामी स्थानिक सराफ्यात व्यापाऱ्यांनी लग्नसराईची ग्राहकी पूर्ण करण्यासाठी जोरदार खरेदी केली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव एक टक्क्याने वाढून १,२१८.९२ डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या गेल्या २६ मार्चपासूनची ही उच्चांकी पातळी आहे.तयार चांदीचा भावही ९०० रुपयांनी वधारून ३८,५०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ८३० रुपयांनी वाढून ३८,१८० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांच्या तेजीसह खरेदीकरिता ५७,००० रुपये व विक्रीसाठी ५८,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. गेल्या वर्षभरापासून सोन्याचा भाव मंदीत आहे. गेल्यावर्षी शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्याने कमी परतावा दिला. यंदा ही कसर भरून निघेल काय, हा प्रश्न आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा महिन्याचा उच्चांक
By admin | Updated: April 7, 2015 03:43 IST