Join us

सोने दीड महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:14 IST

जवाहिऱ्यांकडून होत असलेल्या कमी मागणीमुळे सलग पाचव्या दिवशी गुरुवारी सोने २५० रुपयांनी घसरून सहा आठवड्यांतील

नवी दिल्ली : जवाहिऱ्यांकडून होत असलेल्या कमी मागणीमुळे सलग पाचव्या दिवशी गुरुवारी सोने २५० रुपयांनी घसरून सहा आठवड्यांतील २६,१५० रुपये या नीचांकी पातळीवर आले. त्याचबरोबर चांदीही १५० रुपयांनी घसरून ३४,६०० रुपये प्रति किलो या स्तरावर आली.जागतिक बाजारपेठेतही सोन्याने दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली. आज सिंगापुरात सोन्याचे भाव ०.२ टक्क्याने घसरून १,१११.८३ डॉलर प्रति औंस झाले.अमेरिकेतील घडामोडींचा विपरीत परिणाम सोन्यावर होत आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातच भारतात सध्या ‘पक्ष पंधरवडा’ सुरू असल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे. परिणामत: जवाहिरे आणि व्यापारीही सोन्याची खरेदी करीत नाहीत. त्यामुळेही सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे २५० रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,१५० आणि २६,००० रुपये झाला. यापूर्वी १३ आॅगस्ट रोजी हा भाव होता. गेल्या दोन दिवसांत सोने ८५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.सोन्याप्रमाणेच उद्योग आणि नाणे उत्पादकांकडून मागणी कमी झाल्याने चांदीचे भाव किलोमागे १५० रुपयांनी घसरून ३४,६०० रुपये झाले. चांदीच्या नाण्याचे भावही एक हजार रुपयांनी घसरले.