नवी दिल्ली : विदेशी बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण व किरकोळ विक्रेत्यांची मागणी घटल्याने स्थानिक सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव २०० रुपयांनी कमी होऊन २६,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी कमजोर झाल्याने चांदीही २०० रुपयांनी कमी होऊन ३६,०५० रुपये प्रतिकिलो राहिली.बाजार जाणकारांच्या मते, विक्रमी उंचीवर पोहोचलेल्या शेअर बाजाराकडे गुंतवणुकदारांचे लक्ष्य आकर्षित झाल्यानेही सराफा बाजारात घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हद्वारा आपला बाँड खरेदी कार्यक्रम मागे घेण्याचा निर्णय सराफा बाजारासाठी अनुकूल ठरेल, असे मानले जात आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव चार वर्षांच्या नीचांकावर आला आहे.देशी बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर बाजारात आज सोन्याचा भाव एक टक्क्याने घटून १,१६१.७५ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव २.४ टक्क्यांच्या घसरणीसह १५.७७ डॉलर प्रतिऔंस राहिला. फेब्रुवारी २०१० नंतरची ही नीचांकी पातळी आहे.दिल्ली बाजारातच ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २०० रुपयांनी कोसळून अनुक्रमे २६,३५० रुपये व २६,१५० रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २०० रुपयांनी स्वस्त होऊन २३,७०० रुपये झाला.तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी घटून ३६,०५० रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४६० रुपयांच्या घसरणीसह ३५,३४० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी कमी होऊन खरेदीकरिता ६०,००० रुपये व विक्रीसाठी ६१,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जागतिक बाजारात चार वर्षांच्या नीचांकामुळे सराफ्यात घसरण
By admin | Updated: November 4, 2014 02:25 IST