नवी दिल्ली : सोन्याच्या भावाने मंगळवारी ८४० रुपयांची यंदाची दिवसभरातली सर्वाधिक झेप घेऊन पुन्हा एकदा २७,००० हजारांची पातळी पार केली. या तेजीने सोन्याचा भाव २७,०४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.जागतिक बाजारात मौल्यवान धातूंचे भाव तेजीत राहिले. परिणामी, सोन्याच्या भावात वाढ नोंदली गेली आहे. याशिवाय लग्नसराईचा हंगाम असल्याने आभूषण व किरकोळ विक्रेत्यांची मागणी वधारल्यानेही बाजार कल तेजीत राहिला.गेल्या सहा दिवसांत सोन्याचा भाव ७३० रुपयांनी स्वस्त झाला. मात्र, यानंतर रिझर्व्ह बँकेने सोने आयातीशी संबंधित ८०:२० योजना मागे घेतल्याने व आयात सूट दिल्यानंतर सोन्याच्या उलाढालीत तेजी परतली.गुरुवारी सोन्याचा भाव ८४० रुपयांनी उंचावून २७,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. याआधी ३० आॅक्टोबर रोजी सोन्याच्या भावाने ही पातळी गाठली होती. चांदीचा भावही २,७०० रुपयांच्या तेजीसह ३७,००० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांद्वारे शिक्क्यांची खरेदी वाढल्याने चांदीच्या भावातही वाढ नोंदली गेली आहे. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, १९ सप्टेंबरनंतर प्रथमच न्यूयॉर्क बाजारात काल सोन्याचा भाव ३.६९ टक्क्यांनी उंचावून १,२१८.१० डॉलर प्रतिऔंस झाला. तेलाच्या मागणीत सुधारणा झाल्याने सोन्याला ही नवी चकाकी मिळाली. जागतिक पातळीवर चांदीचा भाव ७.३ टक्क्यांनी वाढून १६.६९ डॉलरवर पोहोचला. ही सप्टेंबर २०१३ नंतरची सर्वोच्च पातळी आहे. याशिवाय सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेते यांच्याकडून मागणी वाढल्याने सोन्याला नवी झळाली मिळाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याला मिळाली तेजीची झळाळी
By admin | Updated: December 3, 2014 00:29 IST