Join us

सोने तेजीत, चांदी मात्र स्वस्त

By admin | Updated: October 22, 2015 03:32 IST

जागतिक बाजारपेठेत असलेला उठाव आणि सणासुदीचा हंगाम ध्यानात घेऊन जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १०५ रुपयांनी वधारून

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत असलेला उठाव आणि सणासुदीचा हंगाम ध्यानात घेऊन जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १०५ रुपयांनी वधारून २७,३३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले.दुसरीकडे उद्योग आणि नाणे उत्पादकांकडून मागणी घटल्याने चांदी १७५ रुपयांनी घसरून ३७ हजारांच्या खाली म्हणजे ३६,९०० रु. प्रति किलो झाली. अमेरिकी फेडरल बँक व्याजदर २०१६ मध्ये वाढविण्याची शक्यता असली तरीही पुढील आखाड्यात व्याजदराचा आढावा घेण्यासाठी बैठक होत आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यामुळे सोन्याला थोडाफार उठाव आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सिंगापूर येथे सोने ०.३ टक्क्याने वधारून १,१७९.३५ अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. उद्या दसरा असून, त्यानंतर दिवाळीचा मोसम सुरू होत आहे. या काळात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी सोन्याची जोरदार खरेदी चालविल्याने भाव वाढले, असे विश्लेषकांनी सांगितले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १० ग्रॅममागे १०५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,३३५ आणि २७,१८५ रुपये झाले. मंगळवारी सोने ८० रुपयांनी वाढले होते.चांदीच्या नाण्याचे भावही १ हजार रुपयांनी घसरले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ५१ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५२ हजार रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)