मुंबई : चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा परिणाम म्हणून भारतातील सोन्याची मागणी २०१७मध्ये ३०० टनांनी खाली येणे अपेक्षित आहे. घटलेली मागणी मूळ पदावर लगेचच येण्याचीही शक्यता नाही. गेल्या काही वर्षांत सोन्याची मासिक आयात ही सरासरी ६५ ते ७० टन होती. ती २०१६मध्ये फेब्रुवारी ते सप्टेंबर कालावधीत निम्म्याने खाली आली. आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सण व लग्नसराईमुळे ती काहीशी भरून आली. तथापि, नोटाबंदीच्या निर्णयामुळे सोन्याच्या मागणीत घट अपेक्षित आहे.भारतात सोन्याची खरेदी प्रामुख्याने रोखीने होते. ती २०१७मध्ये ३०० टनांनी खाली येईल, असे साऊथ आशिया अॅण्ड यूएई, जीएफएमएस, थॉमसन रायटर्सचे आघाडीचे विश्लेषक सुधीश नाम्बिअथ यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांतील भारतातील सोन्याची वार्षिक सरासरी मागणी ही ८७५ टन होती व त्यातील ८५-९० टक्के सोने आयात केलेले होते. मागणीपैकी सुमारे २० टक्के मागणी ही तस्करीतून पूर्ण केली जाते.
सोन्याची मागणी ३०० टनांनी घटणार
By admin | Updated: January 2, 2017 00:58 IST