Join us

सोन्याची मागणी १४ टक्क्यांनी घटली

By admin | Updated: February 13, 2015 06:47 IST

भारतात सोन्याची मागणी २०१४ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी घटून ८४२.६ टन राहिली. मुख्यत: आयातीवरील निर्बंधांमुळे

मुंबई : भारतात सोन्याची मागणी २०१४ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी घटून ८४२.६ टन राहिली. मुख्यत: आयातीवरील निर्बंधांमुळे असे घडल्याचे मत जागतिक सुवर्ण परिषद अर्थात डब्ल्यूजीसीने व्यक्त केले आहे. सुवर्ण परिषदेच्या ‘सोन्याच्या मागणीचा कल २०१४’ नाम अहवालात २०१३ मध्ये एकूण मागणी ९७४.८ टन होती, असे म्हटले आहे. किमतीच्या दृष्टीने सोन्याची मागणी २०१४ मध्ये १९ टक्क्यांनी घटून २,०८,९७९.२ कोटी रुपये राहिली. २०१३ मध्ये ही मागणी २,५७,२११.४ कोटी रुपये होती. अहवालानुसार, जागतिक सराफा बाजारासाठी २०१४ हे वर्ष स्थैर्य आणि नव-प्रवर्तनाचे राहिले. यात सोन्याची वार्षिक मागणी केवळ चार टक्क्यांनी घटून ३,९२४ टन राहिली. डब्ल्यूजीसीचे व्यवस्थापकीय संचालक (गुंतवणूक धोरण) मार्कस ग्रब यांनी सांगितले की, सरकारद्वारे सोने आयातीवर निर्बंध असतानाही भारतीय आभूषणांसाठी हे वर्ष उल्लेखनीय राहिले. यावरून भारत आणि सोने यातील दृढ नातेसंबंध दिसून येतात. दरम्यान, चीनची सोन्याची मागणी २०११ आणि २०१२ च्या पातळीवर आली. कारण ग्राहक व गुंतवणूकदार यांनी २०१३ मध्ये जमा असलेल्या सोन्याची उलाढाल करण्यास वेळ लावला. (प्रतिनिधी)