नवी दिल्ली : सलग चौथ्या व्यावसायिक सत्राच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याचा भाव २७ हजारांच्या पातळीखाली गेला. १०० रुपयांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव २६,९७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. ही गेल्या १० आठवड्यांची नीचांकी पातळी आहे.जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली आहे. तथापि, चांदीचा भाव ५० रुपयांचा बळकटीसह ३६,८०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. उल्लेखनीय म्हणजे, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिला. आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापारी यांची मागणी घटल्याने बाजारात ही घसरण नोंदली गेली आहे. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३२ टक्क्यांनी घटून १,१९७.९० डॉलर प्रतिऔंस झाला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव ५० रुपयांनी वाढून ३६,८०० रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १०५ रुपयांच्या तेजीसह ३६,२४५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५८,००० रुपये, तर विक्रीकरता ५९,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. लग्नसराईत सोने घसरत असल्याने खरेदीची संधी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने २७ हजारांच्या खाली
By admin | Updated: February 25, 2015 00:26 IST