नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव मागणीअभावी ५० रुपयांनी स्वस्त होऊन २८,२७० रुपये प्रतितोळा झाला. औद्योगिक संस्थांकडून कमी मागणी झाल्याने चांदीचा भावही ५० रुपयांनी घटून ४१,४५० रुपये प्रतिकिलो राहिला. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागणी सुस्त पडल्याने आभूषण विक्रेत्यांनी तेजीत असलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक केली. याचा बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला. जागतिक बाजारात या मौल्यवान धातूंचे भाव कमजोर असल्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले. दिल्ली बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५० रुपयांनी घसरून अनुक्रमे २८,२७० रुपये आणि २८,०७० रुपये प्रतितोळा झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,८०० रुपयांवर कायम राहिला. कमजोर मागणीमुळे तयार चांदीचा भाव ५० रुपयांनी कमी होऊन ४१,४५० रुपये प्रतिकिलो आणि साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह ४०,९०० रुपये प्रतिकिलोवर आला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव ७८,००० ते ७९,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदी घसरले
By admin | Updated: May 27, 2014 06:09 IST