नवी दिल्ली : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने-चांदीच्या भावात तेजी परतली. सोन्याचा भाव ३७५ रुपयांनी वधारून २६,३७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या बळावर स्थानिक सराफ्यात ही वाढ नोंदली गेली आहे. चांदीचा भावही जोरदार खरेदीमुळे तब्बल ८०० रुपयांनी उंचावून ३६,२०० रुपये प्रतिकिलो राहिला. जाणकारांनी सांगितले की, आभूषण निर्मात्यांच्या जोरदार खरेदीमुळे बाजारात ही तेजी परतली. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात संभाव्य वाढ न झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकावरून वधारला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.९ टक्क्यांनी वाढून १,१७७.९६ डॉलर प्रतिऔंस व चांदी ०.२ टक्क्यांच्या तेजीसह १५.९७ डॉलर प्रतिऔंस झाला. दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३७५ रुपयांच्या झळाळीसह अनुक्रमे २६,३७५ रुपये व २६,१७५ रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २३,६०० रुपयांवर स्थिरावला.सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव ८०० रुपयांनी झेपावून ३६,२०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३५,९१० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वाढून खरेदीकरिता ५५,००० रुपये व विक्रीसाठी ५६,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा
By admin | Updated: March 19, 2015 23:29 IST